अळ्यांनी कुरतडले स्वप्न...

दाभाडी (ता.बदनापूर) :रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजारीच्या पिकाचे झालेले बेहाल.
दाभाडी (ता.बदनापूर) :रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजारीच्या पिकाचे झालेले बेहाल.

दाभाडी (ता.बदनापूर) - परिसरात यंदा पावसाने पाठ फिरविली. अधूनमधून पडलेल्या रिमझिम पावसावर कशीबशी पिके उगवून आली. दुष्काळाचा आधीच फटका बसलेला असल्याने बहरलेली पिके पाहून किमान दोन पैसे खिशात पडतील अशी स्वप्नं शेतकरी रंगवत होते; मात्र अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि पिकांसोबतच स्वप्नेही कुरतडली जात आहेत. 

दाभाडी परिसरात सुरवातीच्या मध्यम पावसावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी, मूग, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची पेरणी केली होती. अधूनमधून पडणाऱ्या तुरळक पावसावर कशीबशी पिके आतापर्यंत तगली. परिसरात यंदा मका, बाजरी, सोयाबीन आदी नगदी पिकांचा परिसरात पेरा जास्त आहे; मात्र पिके बहरात असतानाच अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. यात मका, बाजरी, सोयाबीन या पिकांवरील कोवळ्या कणसांवर कुरतडणाऱ्या अळीने आक्रमण केले. या अळ्या कणसांतील दाणे नष्ट करीत असल्याने आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी आलेला माल शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर नष्ट होत आहे. हेच चित्र कायम राहिल्यास यावर्षी उत्पन्नाला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे.

परिसरातील दाभाडीसह डोंगरगाव, वाघ्रळ, वंजारवाडी, साखरवाडी, पिंपळगाव, किन्होळा, डावरगाव, खामगाव, सागरवाडी, विल्हाडी, एकेफळ आदी भागांतही मका, बाजरी पिकांवर अळीचा अतिप्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांची महागडी औषधी फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव हवा तसा कमी झालेला नाही. त्यामुळे फवारणीवरील खर्चही वाया गेला आहे. परिणामी आधीच दुष्काळात होरपळून निघालेला शेतकरी अजूनही जास्त आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी खचून गेले आहेत. दरम्यान, या नुकसान होत असलेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाकडून त्वरित पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com