जखमी हरणाची "पार्टी'साठी हत्या? 

अनिरुद्ध धर्माधिकारी
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका हरणाचा मृत्यू झाला. मात्र, हे हरीण कापून ढाबाचालकाने मेजवाणी दिल्याच्या संशयावरून दाेन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आष्टी (बीड) - हरणाचा कळप जात असताना चारचाकीच्या धडकेत एक हरीण जखमी झाले. यावेळी संवेदनशीलता दाखवून त्याच्यावर उपचार करण्याऐवजी पार्टीसाठी हरणाची हत्या करण्याचा संतापजनक प्रकार तालुक्‍यातील सोलापूरवाडी येथे घडला. सोमवारी (ता. 16) सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराबाबत ढाबाचालकासह एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील सोलापूरवाडी येथे पिंपळा-सोलापूरवाडी रस्त्यावरील खरडगव्हाण फाट्याजवळ हरणांचा कळप जात असताना एका चारचाकी वाहनाने कळपाला धडक दिली. त्यात एक हरीण जखमी होऊन कळप पुढे निघून गेला. एकाचा या फाट्यावर ढाबा असून, अंधारात पडलेल्या या जखमी हरणाला दोघांनी ढाब्यावर नेऊन कापले. याबाबत पोलिसांना ग्रामस्थांनी कळविल्यावर पोलिस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत वन विभागात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पडदा टाकण्याचा प्रयत्न 
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधिताने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून ढाबा सुरू केला आहे. या हरणाची दोघांनी ढाब्यावर पार्टी करण्यासाठी शिकार केली. मात्र, त्याचा बोभाटा झाल्यावर हरीण अपघातात जखमी झाले होते, असा बनाव करण्यात आला, अशी चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured deer killed for "party"?