esakal | ऊसतोड मजुरांना तपासणी करून मूळ गावी पाठवा - धनंजय मुंडे 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

लॉकडाऊनमुळे बीड, अहमदनगरसह इतर जिल्ह्यांतील दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभाग व अन्य ठिकाणी अडकून पडले आहेत. ऊसतोड मजुरांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

ऊसतोड मजुरांना तपासणी करून मूळ गावी पाठवा - धनंजय मुंडे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जि. बीड) - राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यांतील निवारागृहे यांसह ठिकठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करून पशुधनासह कोरोना संक्रमण रोखण्याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या मूळ गावी परतण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

लॉकडाऊनमुळे बीड, अहमदनगरसह इतर जिल्ह्यांतील दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभाग व अन्य ठिकाणी अडकून पडले आहेत. काही साखर कारखान्यांनी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची तात्पुरती निवास, भोजन आदी व्यवस्था केली आहे. काही कारखाने बंद झाल्यामुळे गावी परत निघालेले ऊसतोड मजूर विविध जिल्ह्यांमध्ये अडकून पडले असून स्थानिक प्रशासन त्यांना मदत पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी विखुरलेल्या व लाखात असलेल्या मजुरांची प्रचंड अडचण वाढणार आहे. ऊसतोड मजुरांच्या उपजीविकेच्या प्रश्नासह त्यांच्या पशुधनाचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, तसेच ऊसतोड कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबातील वृद्ध व लहान मुले हे अडचणीत आहेत.

ही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या सर्व ऊसतोड मजुरांना त्यांच्या पशुधनासह आपापल्या मूळ गावी आणणे आता अनिवार्य बनले आहे. अडकलेल्या मजुरांची संपूर्ण माहिती त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यामुळे संक्रमणाच्या धोक्याला टाळत मानवी दृष्टिकोनातून या मजुरांना स्वगृही आणण्यात यावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस