अधू संसाराला दिले हिंमतीने बळ...! 

अनिरुद्ध धर्माधिकारी 
मंगळवार, 3 जानेवारी 2017

आष्टी - दहा वर्षांपूर्वी पतीला एका अपघातात अपंगत्व आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतही हिंमत न हारता अधू संसाराचा गाडा हाकणाऱ्या सविता रावसाहेब धोंडे यांची कहानी प्रेरणादायी आहे. रोजंदारीवर सुरवात करून या सावित्रीने सध्या स्वतःची आर्थिक घडी बऱ्यापैकी बसवत मुलांनाही चांगले शिक्षण मिळण्याची सोय केली आहे. 

आष्टी - दहा वर्षांपूर्वी पतीला एका अपघातात अपंगत्व आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतही हिंमत न हारता अधू संसाराचा गाडा हाकणाऱ्या सविता रावसाहेब धोंडे यांची कहानी प्रेरणादायी आहे. रोजंदारीवर सुरवात करून या सावित्रीने सध्या स्वतःची आर्थिक घडी बऱ्यापैकी बसवत मुलांनाही चांगले शिक्षण मिळण्याची सोय केली आहे. 

शहरातील भाजीमंडई रस्त्यावर राहणाऱ्या सविता धोंडे (वय 32 वर्षे) यांचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला. दुर्दैवाने एका अपघातात त्यांचे पती रावसाहेब धोंडे यांना अपंगत्व आले. कोणतेही काम करता येत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने काम केल्याशिवाय उदरनिर्वाह शक्‍य नव्हता. अशातच हा प्रसंग आल्याने सविता धोंडे सुरवातीला गांगरून गेल्या; परंतु नंतर मात्र हिंमत न हारता त्यांनी पती व दोन मुलांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 

सुरवातीला त्यांनी उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर काम करण्यास सुरवात केली. यातून थोडे पैसे बाजूला काढून घरातच एक छोटेखानी किराणा दुकान सुरू केले; परंतु किराणा दुकानाचा त्यांचा निर्णय यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा रोजगार शोधावा लागला. लोकांच्या घरी स्वयंपाक करून त्यांनी पुन्हा पैशांची जमवाजमव केली. या पैशांतून त्यांनी 50 हजार रुपयांचे कांडप मशीन घेतले. यातून त्यांना घरबसल्या चांगला रोजगार मिळू लागला. गेल्या पाच वर्षांपासून कांडप मशीनच्या जोरावरच त्या त्यांच्या संसाराचा गाडा हाकत आहेत. यातून त्यांना महिन्याला सुमारे 15 हजारांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये, याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. सध्या त्यांचा मोठा मुलगा जामखेड येथे अकरावी (विज्ञान) शाखेत शिकत आहे, तर दुसरा आष्टीत आठवीत शिकत आहे. प्रतिकूल परिस्थितीत हिंमत न हारता सविताताईंनी हिंमत दाखवून संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढला आहे. 

Web Title: Inspirational story of Savita dhone