
- भुक लागल्यामुळे सोबतच्या मुलाचे न विचारता दोन बिस्कीट खाल्ल्याची शिक्षा म्हणून संस्थाचालकाने एका विद्यार्थ्यांस वायरने मारहाण केली.
- हा प्रकार निल्लोड (ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे मंगळवारी (ता.१६)उघडकीस आला आहे.
- विद्यार्थ्याच्या आईने वडोद बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर संस्थाचालक रामेश्वर पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निल्लोड : भूक लागल्यामुळे सोबतच्या मुलाचे न विचारता दोन बिस्कीट खाल्ल्याची शिक्षा म्हणून संस्थाचालकाने एका विद्यार्थ्यांस वायरने मारहाण केल्याचा प्रकार निल्लोड (ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे मंगळवारी (ता. 16)उघडकीस आला आहे. विद्यार्थ्याच्या आईने वडोद बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर संस्थाचालक रामेश्वर पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहीती अशी की, निरंजन सतिष जाधव (वय 10, रा. औरंगाबाद) हा विद्यार्थी औरंगाबाद-जळगाव महामार्गालगत निल्लोड फाटा (ता. सिल्लोड) येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. भूक लागल्यामुळे सोबतच्या मुलाचे न विचारता दोन बिस्कीट खाल्ल्यामुळे संस्था चालक रामेश्वर पवार यांनी अकरा जुलै रोजी चोरी का केली म्हणून माईकच्या वायरने निरंजन यास बेदम मारहाण केली.
मुलाची आई रविवारी (ता. 14) भेटायला गेली असता चेहऱ्यावरील वळ पाहून चौकशी केल्यावर झालेला प्रकार उघडकीस आला. मारहाण केल्यानंतर या विद्यार्थ्यांवर कोणतेही उपचार केले नसल्याने संतप्त झाल्याने त्याच्या आईने मुलाला औरंगाबाद येथील घरी घेऊन आल्या. याबाबत विद्यार्थ्याची आई चैत्राली जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आणि सुटका
निल्लोड (ता. सिल्लोड) येथील निवासी शाळेच्या विद्यार्थ्याला वायरने बेदम मारहाण केल्याच्या गंभीर गुन्ह्यानंतरही याप्रकरणी संस्थाचालक रामेश्वर पवार यांना पोलीसांनी केवळ तालुका दंडाधिकारी (तहसिलदार) यांच्यासमोर हजर केले. या प्रकरणात त्वरीत जामीन मंजुर झाल्याने आश्यर्य व्यक्त होत आहे.