esakal | हिंगोली जिल्ह्यात ६३ कोटींचा विमा परतावा मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

पीक विमा मंजूर

हिंगोली जिल्ह्यात ६३ कोटींचा विमा परतावा मंजूर

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत गतवर्षीच्या २०२०- २१ खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील ७६ हजार ११६ शेतकऱ्यांना ६३ कोटी सहा लाख रुपये विमापरतावा मंजूर झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात २०२० च्या खरीप हंगामात तीन लाख ७० हजार ४७८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यात सोयाबीन दोन लाख ६३ हजार ६७७ हेक्टर, तूर ४४ हजार ६३९ हेक्टर, मूग आठ हजार २८८ हेक्टर, उडीद सह हजार ६२० हेक्टर, ज्वारी सहा हजार ८९१ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश होतो. तीन लाख दोन हजार ६३६ शेतकऱ्यांनी एक लाख ४७ हजार २३६ हेक्टरवरील पिकांसाठी ६०८ कोटी ४८ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते. जोरदार पावसामुळे नाले, नद्यांचे पाणी पिकात शिरुन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

ऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस सुरु राहिला. त्यामुळे खरिपातील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले होते. विविध निकषांच्या आधारे जिल्ह्यातील ७६ हजार ११६ पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ६३ कोटी सहा लाख रुपयांचा विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी २०१८- १९ मध्ये दोन लाख ६० हजार ४६५ शेतकऱ्यांनी एक लाख ३३ हजार १६३ हेक्टरवरील पिकांसाठी १०३ कोटी १० लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले. तर २५ हजार ९७५ शेतकऱ्यांना १२ कोटी ६४ लाख रुपये विमा परतावा मंजूर झाला होता.

२०१९- २० मध्ये तीन लाख ४० हजार ३८३ शेतकऱ्यांनी एक लाख ५० हजार ४४३ हेक्टरवरील पिकांसाठी १२७ कोटी ४९ लाख रुपयाचे विमा काढला. तर एक लाख ७२ हजार ८५ शेतकऱ्यांना १२४ कोटी ५३ लाख रुपयांचा विमा परतावा मंजूर करण्यात आला होता. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तब्बल पावणेपाच पट जास्त विमा संरक्षण घेतले होते. परंतु केवळ २५. १५ टक्के शेतकरी पीकविमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे