
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण, आरोग्य व नागरी सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा विमा मंजूर करण्याची मागणी कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष नितीन धामणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड - ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण, आरोग्य व नागरी सुविधा पुरविण्याचे काम ग्रामसेवक करत असतात. राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे काम करताना संसर्ग होऊन अघटित घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मंजूर करावे, अशी मागणी कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष नितीन धामणे व सचिव हरिश्चंद्र काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून देण्यात येत असलेल्या मार्गदर्शनपर सुचना इत्यादीबाबतचा प्रचार ग्रामस्तरावर ग्रामसेवक करत असतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे काम ग्रामसेवक करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी विमा सुरक्षा कवच मंजूर करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा - मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करा ः कुलगुरू
शासनाच्या सुचनेनुसार अंमलबजावणी
ग्रामस्तरावर भिंतीपत्रक, ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून करण्यात येत असून गावातील सार्वजनिक रस्ते, नाली स्वच्छ ठेवणे, व्यक्तिगत स्वच्छतेसंदर्भात जसे की, वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे अशा प्रकारचे प्रबोधन करणे, गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, मलनिस्सारण व्यवस्थापन तसेच रोगराई पसरू नये, म्हणून वेळोवळी फवारणी करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देणे, मंगल कार्यालय सील करणे, किराणा दुकाने तसेच भाजी मंडई या सारख्या ठिकाणी सामाजीक सुरक्षित अंतर ठेवणे, गावामध्ये शहरातून किंवा इतर भागातून कोणी व्यक्ती आल्यास त्याबाबत माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे तसेच गावातील कोणी व्यक्ती आजारी असल्यास त्याची माहिती ताबडतोब डॉक्टर, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येत आहे. शासनाच्या सुचनेनुसार गाव पातळीवर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी सदर कामांची अंमलबजावणी करीत आहेत.
हे ही वाचलेच पाहिजे - विनाकारण फिरु नका, वाहने जप्त करू : डॉ. विपिन
आरोग्याचे संरक्षण व्हावे
गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. परंतु ग्रामपातळीवर कोरोना विषाणू नियंत्रण, आरोग्य व नागरी सुविधा पुरविण्याचे काम करताना वरील सर्वांना स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य जसे की, कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठीचे उत्तम प्रकारचे मास्क, हातमोजे, ॲप्रॉन इत्यादी साधने, पाणी शुद्धीकरण करण्यासाठी तुरटी, क्लोरीनयुक्त ब्लिचिंग पावडर लॉकडाऊनमुळे बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे गावस्तरावर काम करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी, तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विमा सुरक्षा कवच हवे
कोरोना विषाणू राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे काम करताना वरील सर्वांना संसर्ग होऊन अघटीत घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यकारीणी व सर्व ग्रामपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याचे कोरोना विषाणूपासून संरक्षण, प्रतिबंध करण्यासाठीची साहित्य व साधने शासन स्तरावरून त्वरित उपलब्ध करून द्यावीत व आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा सेविका यांच्या प्रमाणेच सर्वांना विमा सुरक्षा कवच म्हणून ५० लाख रुपयाचा विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली असल्याचे कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे राज्य प्रतिनिधी शिवकुमार देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.