'अंबावडे होणार आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ '

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव अंबावडे (ता. रत्नागिरी) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ होणार आहे. होलोग्राम तंत्राने बाबासाहेब स्वत: आत्मचरित्र सांगतील, अशी आगळीवेगळी संकल्पना असून, जगभरातील अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ होईल, अशी माहिती खासदार अमर साबळे यांनी शुक्रवारी (ता. तीन) दिली. 

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव अंबावडे (ता. रत्नागिरी) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ होणार आहे. होलोग्राम तंत्राने बाबासाहेब स्वत: आत्मचरित्र सांगतील, अशी आगळीवेगळी संकल्पना असून, जगभरातील अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ होईल, अशी माहिती खासदार अमर साबळे यांनी शुक्रवारी (ता. तीन) दिली. 

पंतप्रधान दत्तक ग्राम योजनेत खासदार साबळे यांनी अंबावडे गावाला दत्तक घेतलेले आहे. अवघ्या 254 लोकसंख्येच्या या गावाला गेल्यानंतर स्फूर्ती संचारावी, अशी ही संकल्पना आहे. बाबासाहेबांमुळे पावन झालेल्या या गावाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेतलेला आहे. अंबावडे गाव हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पवित्र पर्यटनस्थळ असेल. या ठिकाणी होलोग्राम तंत्र वापरण्यात येत आहे. बाबासाहेबांच्या उपलब्ध असलेल्या भाषणांचे चित्रीकरण वापरून थ्रीडी इफेक्‍टस्‌च्या माध्यमाने बाबासाहेब जिवंत असल्याचा भास होईल. बाबासाहेब स्वत: त्यांचे आत्मचरित्र सांगतील, अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे. या शिवाय बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक स्मृतिस्थळाचे मॉडेल या ठिकाणी राहणार आहे. चैत्यभूमी, दीक्षाभूमी, बाबासाहेबांचे लंडन वास्तव्य, देश-विदेशातील त्यांची स्मारके, बाबासाहेब जिथे जिथे गेले, त्या ठिकाणची मॉडेल्स या ठिकाणी असतील. या शिवाय जगभरातील बुद्धस्तूपांचे मॉडेल्स या ठिकाणी उभारले जाणार आहेत. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या प्रत्येकाला या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी आल्यानंतर धन्य झालो असे वाटेल, देशासह जगभरातील सर्व मॉडेल्सचे दर्शन या ठिकाणी होणार आहे. 

गाव दत्तक घेतल्यानंतर या ठिकाणी राज्य शासनाने चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मृतिस्थळ झाल्यानंतर त्याचा पर्यटनाच्या बुद्धिस्ट सर्किटमध्ये सामावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही खासदार साबळे यांनी सांगितले. कोकणात आलेला प्रत्येक पर्यटक या ठिकाणी यावा म्हणून, समुद्रकिनारी असलेले निगडी ते हरेहरेश्‍वर हे सहा किलोमीटर अंतरास हाऊस बोट चालवली जाणार आहे. कोकणात आलेल्या पर्यटकाला अंबावडेला येता यावे, या ठिकाणी त्याच्या राहण्याची व्यवस्था व्हावी, असा सर्व प्रयत्न आहे. यासाठी 11 एप्रिल 2016 ला मुख्यमंत्र्यांनी चाळीस कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या शिवाय मुंबई- गोवा महामार्ग अंबावडे गावातून वळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन 350 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खासदार साबळे यांनी सांगितले. या रस्त्याच्या कामासाठी रस्ते विकास महामंडळाने कामाला सुरवात केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजकल्याण सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे व वास्तूविशारद पी. के. दास यांनी नुकतीच भेट देऊन कामाच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्मृतिस्थळासाठी सध्याची जागा कमी पडत असून, आणखी 65 एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. गरज पडल्यास शासन ही जागा विकत घेणार आहे. येत्या दोन वर्षांत संपूर्ण काम होईल, अशा पद्धतीचे नियोजन असल्याचे खासदार साबळे यांनी सांगितले. 

Web Title: International tourist Ambawade