भाजपच्या दारी इच्छुकांची वारी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसही तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात
उदगीर - उदगीर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. एकूण चौदा गणांपैकी सर्वसाधारण महिलेसाठी तीन गण राखीव असून या तीन गणांत भाजपकडून एकूण सतरा जणांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या कमी असून भाजपचा भाव या गणामध्ये वधारल्याचे चित्र आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसही तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात
उदगीर - उदगीर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. एकूण चौदा गणांपैकी सर्वसाधारण महिलेसाठी तीन गण राखीव असून या तीन गणांत भाजपकडून एकूण सतरा जणांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या कमी असून भाजपचा भाव या गणामध्ये वधारल्याचे चित्र आहे.

मोदी लाटेमुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला पसंती दिली होती. शिवाय उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी होऊन अठरा नगरसेवकही निवडून येण्याचा इतिहास घडला आहे.

आता उदगीर मतदारसंघात येत्या १६ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. सध्या भाजपचा भाव चांगलाच वधारला आहे. उदगीर पंचायत समितीचे सभापतिपद हे सर्वसाधारण महिलेसाठी अरक्षित झाले आहे. तालुक्‍यातील चौदा गणांपैकी देवर्जन, नागलगाव व तोगरी हे तीन गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहेत. या गणात निवडून येणाऱ्या महिलेस सभापती होण्याची संधी मिळणार आहे.

त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या गणातून आपल्या श्रीमंतीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे. या तीन गणांतून भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असून त्या तुलनेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या कमी प्रमाणात दिसून येत आहे.

देवर्जन गणातून भाजपकडून अंजना गंभिरे, सत्यकला गंभिरे (करवंदी), वनिता रोडगे, अंजली रोडगे (देवर्जन) काँग्रेसकडून राजश्री पाटील (शंभुउमरगा), जगदेवी रोडगे (देवर्जन) यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नंदू पाटील (शंभुउमरगा) यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तोगरी गणातून सरस्वती जाधव (तोंडचिर), शोभा तोंडारे, महानंदा पाटील (तादलापूर), शीला राजुळे, अंजली वाडेकर, इंदुमती येरनाळे (तोगरी), सुनीता गोंदेगावे, चित्रकला जाधव (रावणगाव), काँग्रेसकडून महेश भंडे, इंदुमती येरनाळे यांनी मागणी केली आहे. या गणात शिवसेनेकडून मनोज चिखले यांच्या उमेदवारीची चर्चा असून राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.नागलगाव गणातून सिंधू मुसने (चांदेगाव), प्रतिभा पांडे (पिंपरी), सगीता बाळे, भाग्यश्री चवळे (नागलगाव), विजयालक्ष्मी गोजेगावे (बोरगाव), तर काँग्रेसकडून ऊर्मिला साळुखे, रामराव भोसले, बालाजी शेटकार यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
सभापतिपदासाठी राखीव असलेल्या देवर्जन, नागलगाव व तोगरी गणातून तुल्यबळ उमेदवार शोधून भाजपाला शह देऊन त्या उमेदवारास निवडून आणण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आहे. या तीन गणांत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून, पंचायत समितीमध्ये असलेली काँग्रेसची निर्विवाद सत्ता टिकविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.

Web Title: intrested candidate on bjp door