esakal | चार पथकांद्वारे स्वस्त धान्य दुकानांची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

reshan

कळमनुरी तालुक्यातील सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता यावी, यासाठी धान्य तपासणीसाठी नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, प्रवीण ऋषी, सतीश पाठक यांची चार पथके स्थापन केली आहेत. 

चार पथकांद्वारे स्वस्त धान्य दुकानांची तपासणी

sakal_logo
By
संजय कापसे/विनायक हेंद्रे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानांची नियमित तपासणी करण्यासाठी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी चार पथकांची स्थापना केली आहे. धान्य वाटपामध्ये अनियमितता करणाऱ्या दुकानदारांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबाला सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक कुटुंबाला तीन महिन्याचे धान्य वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा हिंगोलीत दुपारनंतर जाणवतोय शुकशुकाट

एप्रिल महिन्याचे धान्य वाटप

 त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांना एप्रिल महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी तयारी चालविली आहे. या शिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून पाच किलो मोफत तांदूळ लाभार्थींना वाटप करण्याचे कामही स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत करण्यात येत आहे.

तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांचा निर्णय 

 लाभार्थींनी धान्य उचल केल्यानंतर दुकानदारांकडे पावतीचा आग्रह धरावा, असे आवाहन तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केले आहे. तसेच सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता यावी, यासाठी नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, प्रवीण ऋषी, सतीश पाठक यांची चार पथके स्थापन केली आहेत. 

भाव फलक लावण्याच्या सूचना

या कामी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनीही लक्ष घातले आहे. धान्याचे भाव फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देत धान्य वाटपामध्ये अनियमितता करणाऱ्यांची गय करणार नसल्याचे तहसीलदार श्री. वाघमारे सांगितले.

दुकानदारावर गुन्हा दाखल

आखाडा बाळापूर : येथे शिधा पत्रिकाधारकांना जादा दराने धान्य वाटप करणे, तसेच शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप न करता मोघम स्वरुपात धान्य वाटप केल्याच्या आरोपावरून एका स्वस्त धान्य दुकानदाराविरुध्द जीवनावश्‍यक वस्तुंचा काळाबाजार करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.दहा) गुन्हा दाखल झाला आहे.

तहसीलदारांकडे तक्रार

आखाडा बाळापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार ओमप्रकाश ठमके हे शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या नियमानुसार व योग्य दराने धान्य वाटप करीत नसल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे राजू कांबळे, माणिक पंडीत यांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे दुरध्वनीवरून केली होती. 

येथे क्लिक करामहिला शेतकऱ्यांची जिद्द; सोशल मीडियाला बनविली द्राक्षाची बाजारपेठ

पावत्या दिल्या फेकून

त्यावरून शुक्रवारी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मंडळ अधिकारी आनंदराव सुळे यांनी दुकानास भेट देऊन चौकशी केली. या वेळी चौकशीमध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये इ-पॉस मशीनमधून काढलेल्या अनेक पावत्या दुकानातच फेकून दिल्या होत्या. दुकानातील रजिष्टरवर केवळ लाभार्थींचीच नावे लिहण्यात आली होती. 

धान्याचे जादा दराने वाटप

त्यांना नेमके किती धान्य वाटप झाले याचा उल्लेख रजिष्टरवर नव्हता. त्यामुळे धान्याचा काळाबाजार करण्यासाठीच त्यांनी धान्यसाठा करणे सुरु केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य जादा दराने वाटप केले जात असल्याचेही काही शिधापत्रिकाधारकांनी सांगितले.याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपास करीत आहेत.