आठवणींना जोडणारा लोखंडी पूल 

सुहास सदाव्रते 
Friday, 12 June 2020

ऐतिहासिक लोखंडी पूलाला भक्कम आधार देता आला असता. नागरिक, पादचाऱ्यांसाठी तो वापरता आला असता; मात्र असे काहीही झाले नाही. ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोर नामशेष झाला, त्याचे फारसे कुणालाही सोयरसुतक नाही हे विदारक सत्य. 

जालना -  हावडा ब्रीजप्रमाणे अनेक ऐतिहासिक पुलांचे संवर्धन झालेले आहे. आजही असे पूल ठेवा म्हणून दिमाखात उभे आहेत; पण जालन्याचा लोखंडी पूल आता केवळ आठवणींमध्ये राहणार आहे. जुना व नवीन जालना भागाला जोडणारा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल हा दुवा निखळला आहे.

सामाजिक, सांस्कृतिक घटकासह शतकाचा साक्षीदार असलेला पूल आता जालनेकरांना दिसणार नाही. खरेतर हा पूल तसाच ठेवून बाजूला दुसरा उभारता आला असता.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

या ऐतिहासिक लोखंडी पूलाला भक्कम आधार देता आला असता. नागरिक, पादचाऱ्यांसाठी तो वापरता आला असता; मात्र असे काहीही झाले नाही. ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोर नामशेष झाला, त्याचे फारसे कुणालाही सोयरसुतक नाही हे विदारक सत्य. 

शतकाचा साक्षीदार 

पवन जोशी (सामाजिक कार्यकर्ते) : जालना शहराचे एकेकाळचे वैभव म्हणजे लोखंडी पूल. ब्रिटिशकालीन पूल शतकापेक्षा अधिक काळ टिकून राहतो, यावरून गुणवत्ता काय हे सिद्ध होते. नवीन पुलाचे कामही असेच गुणवत्तापूर्ण व प्रशस्त व्हावे, अशी अपेक्षा आहे. 

सामाजिक कामाची सचोटी 

आनंद काळे (नागरिक) : शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हा ब्रिटिशाच्या कामाची सचोटी व दूरदृष्टी काय असेल हे नव्याने सांगायची गरज नाही. नवीन पुलाचे कामही चांगले करावे, लोखंडी पुलाचे अवशेष पालिकेने जतन करून ठेवावे. 

ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा 

सुनील पवार (चित्रकार) : जालना नगरीचे एकेकाळचे ऐतिहासिक वैभव म्हणजे लोखंडी पूल होय. दोन भागांना जोडणारा शतकाचा दुवा निसटला आहे. शहराच्या अनेकविध सुख, दुःख, सामाजिक घडामोडीचा हा इंग्रजकालीन साक्षीदार होता. हा अनमोल ठेवा पालिकेने सांभाळून ठेवावा. 

दोन भागांना जोडणारा दुवा 

सचिन जहागीरदार (नागरिक) : जालना शहराची रचना दोन भागांत विभागली गेली आहे. यात जुना व नवीन जालना अशी ओळख आहे. जुन्या जालन्यात सरस्वती नांदते तर नवीन जालन्यात लक्ष्मीचा वास असतो, असा अलिखित संदर्भ शहराचा आहे. म्हणूनच लक्ष्मी व सरस्वतीला जोडणारा हा शतकाचा साक्षीदार इतिहास जमा होत आहे. पुन्हा असा पूल होणे नाही. नवीन पुलाचे कामही ऐतिहासिक असेच व्हावे, की लोखंडी पुलाचे नाव पुढेही टिकून राहावे अशी अपेक्षा आहे. 

ऐतिहासिक पण..आता काय ? 

डॉ. एकनाथ शिंदे (नागरिक) : शहरातील ऐतिहासिक वैभव म्हणून लोखंडी पूल प्रसिद्ध होता, असे म्हणावे लागेल. निजाम राजवटीत इंग्लंडमधील एका कंपनीने हा पूल बांधला होता. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळात स्वातंत्र्यसैनिकांनी निजाम राजवटीला हादरा देण्याच्या निमित्ताने या लोखंडी पुलाखाली स्फोट घडवून त्यास उडवून देण्याचा प्रयत्न केला होता, असे इतिहासाचे अभ्यासक सांगतात. हा ठेवा जपला जाईल काय? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iron bridge of Jalna

Tags
टॉपिकस
Topic Tags: