असेही मिळते संघर्षातून जगण्याला बळ

sitafal
sitafal

कंधार : भल्या पहाटेपासूनच घरातील इतर कामांची आवराआवर करून वाडी तांड्यावरील स्त्रिया आणि दिमतीला असणारी लहान मुले दोन दिवसांपूर्वी घरी आणलेला कच्चा रानमेवा पक्व झाल्यानंतर टोपलीत भरून उपलब्ध वाहतुकीच्या मदतीने सीताफळ विक्रीसाठी भल्या सकाळी कंधार शहराकडे प्रयाण करत आहेत. जीवन जगण्याचा संघर्षाला बळ मिळावं यासाठी सद्यस्थितीस रानमाळावर उपलब्ध असलेल्या सीताफळाच्या विक्रीतून प्रपंचाचा गाडा हाकला जात असल्याचे चित्र आहे.

कंधार तालुक्यातील डोंगर दऱ्यात विविध प्रजातीच्या वृक्षसंपदा आहेत, त्यात निसर्गदत्त सिताफळांची संख्याही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ज्यामुळे शेतमजुरांना सीताफळ विक्रीतून रोजगार उपलब्ध होतो. जवळपास वीस ते पंचवीस किमी अंतरावरून वाडी तांड्यासह कुरुळा, नागलगाव, धर्मापुरी, बाचोटी, पांगरा, कलंबर, पानभोसी, चिखलभोसी, शेकापूर, घोडज, फुलवळ, घागरदरा, सोमठाणा, पानशेवडी, लालवाडी, गऊळ, फुलवळ यासह तालुक्यातील विविध ठिकाणाहून सीताफळ विक्रीतून रोजगार मिळावा या अपेक्षेपोटी स्त्रि, पुरुष आणि मुले उपलब्ध वाहतुकीच्या साधनांचा आधार घेत कंधार शहरात येत आहेत. तालुक्यातील डोंगर दऱ्यात मोठ्या प्रमाणात निसर्गदत्त सीताफळाच्या झाडांना फळे लगडली होती. त्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान उर्वरित बहाराने काही फळे टिकली जी आजच्या घडीस शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदतगार ठरताना दिसत आहेत. 

हिवाळ्यात शहरी असो वा ग्रामीण या भागातील खवय्येदारांना सीताफळाचे माधुर्य आकर्षित करताना दिसत आहे. एवढंच काय तर मधुमेह बाधित रुग्णांना सुद्धा खाण्याचा मोह आवरत नाही हे विशेष. आयुर्वेदात या रानमेव्यास अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत सीताफळ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडताना पहावयास मिळत आहे. या सीताफळ विक्रीतून एक कॅरेट मागे साधारणतः २००ते ३०० रुपये मिळत असल्याचे मजुरदारांनी सांगितले. परंतु माळरानावरील अस्सल रानमेव्याचा गोडवा शहरी भागात येण्यासाठीचे परिश्रमसुद्धा थक्क करणारे आहेत. 

दिवसभर तहान भूक विसरून फळे गोळा करणे, परिपक्व झाल्यानंतर बाजारात विक्रीला आणणे त्यासाठीचा खर्च यातून केवळ दिवसभराचा रोजगार निघत असल्याचे मजूर सांगत होते. परतीच्या पावसाने धान्याचे नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यास आणि मजुरास काही दिवसापूरता का होईना या सीताफळ विक्रीतून जगण्यासाठीचा तात्पुरता का होईना आर्थिक आधार मिळतो आहे.

गुजराण करण्यासाठी कसाबसा रोजगार मिळतो
आम्हाला शेती नाही आणि आता काही रोजगारही नाही. दिवसभर कुटुंबातील सर्वजण रानात फिरून सीताफळ गोळा करून पिकल्यानंतर कंधारच्या बाजारात विक्रीसाठी आणतोत. यातून गुजराण करण्यासाठी कसाबसा रोजगार मिळतो.
- सखुबाई वाघमारे, शेतमजूर शेकापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com