Success Story: गुऱ्हाळातून मिळवून दिला सतरा जणांना रोजगार; माजलगावच्या नैसर्गिक गुळास पुणे, औरंगाबादेत मागणी

कमलेश जाब्रस
Monday, 7 December 2020

माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील नैसर्गिक गुऱ्हाळात सतरा जणांना रोजगार मिळत आहे. गुऱ्हाळात तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक गुळाची विक्री पुणे, औरंगाबादला होत असल्याने टाळेबंदीनंतर शेतीमध्ये केलेल्या या व्यवसायात जाधव बंधूंचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

माजलगाव (जि.बीड) : माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील नैसर्गिक गुऱ्हाळात सतरा जणांना रोजगार मिळत आहे. गुऱ्हाळात तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक गुळाची विक्री पुणे, औरंगाबादला होत असल्याने टाळेबंदीनंतर शेतीमध्ये केलेल्या या व्यवसायात जाधव बंधूंचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तालुक्यातील केसापुरी गावात राधाकृष्ण जाधव, प्रकाश जाधव यांची अठरा एकर शेतजमीन आहे. या ठिकाणी त्यांनी सात एकरात उसाची लागवड केली आहे, तर दोन एकर फळबाग आणि उर्वरित नऊ एकर शेतामध्ये कापुस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा या पिकांची लागवड करतात. उसाचे पिक जोमात आहे.

मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या उसामुळे जाधव बंधूंनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले आणि त्यांनी साडेतीन लाख रूपये खर्चुन नैसर्गिक गुऱ्हाळ (नैसर्गिक गुळ निर्मिती) वीस गुंठे क्षेत्रात उभारला. आजघडीला या गुऱ्हाळात त्यांच्या कुटूंबातील सात आणि इतर १० अशा सतरा जणांना रोजगार मिळत आहे. दिवसाकाठी दहा टन उसाचे गाळप या गुऱ्हाळात होऊन ११ क्विंटल नैसर्गिक गुळाची निर्मिती होत आहे. नैसर्गिक गुळ असल्याने गुळाला मोठी मागणी आहे. ६५ ते ८० रूपये किलोप्रमाणे या गुळाची विक्री होत असून माजलगावच्या बाजारपेठेसह पुणे, औरंगाबादच्या बाजारात गुळाची विक्री होते.
 

सध्या शेतातील उसाचे गाळप सुरू आहे. उसाची कमतरता जाणवल्यास कारखान्याच्या भावापेक्षा २०० रूपये जास्त देऊन मोगरा येथील जोशी यांचा आणि काडीवडगाव येथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक शेतीचा उस विकत घेणार आहे.
- राधाकृष्ण जाधव, शेतकरी

शेती व्यवसाय हा आतबट्याचा होत चालला आहे. त्याबरोबरच निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला उद्योग बनविण्याची गरज आहे. शेतीला उद्योग बनविल्यास निश्चितच मोठा फायदा मिळतो.
- प्रकाश जाधव, शेतकरी.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaggery Industry Give Employment To Seventeen People Majalgaon