वेळेचा दुप्पट चुराडा!

Jalana-Road
Jalana-Road

औरंगाबाद - जालना रोडच्या रुंदीकरणाचा प्रयोग थंडबस्त्यात गेल्याने शहरवासीयांना रात्री एखादे अंतर कापण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेच अंतर कापण्यासाठी दिवसा दुप्पट वेळ लागतो, अशी आकडेवारी ‘गुगल मॅप्सच्या रियल ट्रॅव्हल टाईम’द्वारे समोर येते. जालना रोडला पर्यायी रस्ता असणारा व्हीआयपी रोड तर तीनपट अधिक वेळखाऊ असल्याचेही यातून दिसून येते. त्यामुळे जालना रोडला रुंदीकरण आवश्‍यकच असल्याचे स्पष्ट होते.

या रस्त्यावरील हा भार कमी करण्यासाठी असणारे रुंदीकरण, नवा सर्व्हिस रोड आणि उड्डाणपूल, अंडरपास असे सगळेच प्रकल्प थंडबस्त्यात गेले. त्यामुळे या रस्त्यावर अधिकची वर्दळ होऊन शहरवासीयांचा दुप्पट वेळ वाया जात आहे. गुगल मॅप्सच्या ‘रियल ट्रॅव्हल टाईम’नुसार जालना रोडवरील शहीद स्तंभ (नगर नाका) ते केंब्रिज शाळा हे १०.३ किलोमीटर अंतर रात्रीच्या वेळेस कापायचे असेल तर १३ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, हाच कालावधी दिवसा २४ मिनिटांपर्यंत जातो. अरुंद आणि खड्डेमय रस्ता यामुळे हा अधिकचा विलंब होतो.

पर्यायी रस्ता तिप्पट वेळ घेणारा 
जालना रोडला पर्याय म्हणून गुगल मॅप व्हीआयपी रस्त्याचा विकल्प दाखवतो; मात्र हा रस्ता दीडपट अधिक अंतराचा (१३.३ किमी) आणि तीनपट अधिक वेळखाऊ (३८ मी.) असल्याने नागरिक त्याचा वापर करणे सहसा टाळतात. शिवाय या रस्त्यावर बारापुल्ला, मकाई आणि मेहमूद दरवाजा अशी कोंडी करणारी ठिकाणे (चोकपॉईंट) असल्याने हा कालावधी आणखी वाढतो.

सायंकाळी पाचनंतर ‘संथ’
जुने-नवे शहर, शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहती यांना जोडणारा रस्ता म्हणून जालना रोडवर सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेत कंपनीच्या बस आणि दुचाकींची मोठी संख्या असते. ज्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी बघायला मिळते. वाहतूक विभागाने पारंपरिक कामाची पद्धत बदलत नवी सिग्नल यंत्रणा अस्तित्वात आणली आहे. मात्र, या यंत्रणेचा वेळ, इंधन वाचविण्यासाठी फारसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे.

चौकाचौकांची तीच तऱ्हा! 
जालना रोडवरील दूध डेअरी, अकाशवाणी, मुकुंदवाडी या चौकांमध्ये वाहनाचालकांचा चांगलाच वेळ जातो. गुगल मॅपद्वारे तपासले असता, या चौकांमध्ये नेहमीच ‘ट्रॅफिक जाम’ असल्याचे दिसेत. आकाशवाणी चौकात तर दूध डेअरी चौकाकडून येणारी रहदारी अनेकदा मोंढा नाका उड्डाणपुलाला टेकते. जालना रोडवर असलेल्या चौकांमध्ये अंडरपास आणि उड्डाणपुलांची उभारणी आज गरजेची वाटत नसली, तरी भविष्यात तो उभारणे अनिवार्य ठरेल.

बंगळुरू आणि हैदराबाद येथील उद्योगांनी रहदारीच्या डोकेदुखीने स्थलांतराचा निर्णय घेतला. तेव्हा तेथे ‘रोड ऑन रोड’ अस्तित्वात आला. आपण उद्योगधंदे निघून जाण्याची वाट पाहणार आहोत का? रिंग रोड तयार करणे हा जालना रस्त्याच्या रहदारीला पर्याय नाही.
- अजय ठाकूर, रस्ता विषयाचे अभ्यासक

जालना रोडचे रुंदीकरण आवश्‍यकच   
पर्यायी रस्त्यांचा प्रवास तिप्पट वेळखाऊ   
‘गुगल मॅप्स रियल ट्रॅव्हल टाईम’ची आकडेवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com