चावडीवरच्या गप्पांमध्ये भरू लागलाय रंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

जळकोट - तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानानंतर तीन गट व सहा गणात निकालाची कमालीची उत्सुकता लागली असून विजयश्रीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याविषयी चावडीवरच्या गप्पांना चांगलाच रंग भरू लागला आहे.

निवडणुकीत वांजरवाडा, घोणसी व माळहिप्परगा या तीन गटांतून तुल्यबळ उमेदवार असल्याने निवडणूक आखाड्यात रंगत आली. विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार, समर्थकांनी तालुका पिंजून काढत निवडणुकीत रंगत वाढवली. प्रचार, भोंगे, प्रचाराची वाहने, सभा, बैठका, भेटीगाठीं आदींनी वातावरण तापले. मतदानानंतर आता निकालाचे अंदाज बांधले जात आहेत. 

तालुक्‍यात पंचायत समितीचे सहा गण असून यात वांजरवाडा, जगळपूर, घोणसी, अतनूर, माळहिप्परगा व मंगरूळ या गणांचा समावेश आहे. प्रत्येक गणात कोण निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असल्याने मतमोजणीत रंगत वाढणार आहे. सर्वपक्षीय उमेदवारांना आपणच निवडून येणार याचा आत्मविश्वास आहे, तर त्यांचे समर्थक आपल्या उमेदवाराचा विजय कसा होणार आहे, विजयश्रीची माळ त्यांच्याच गळ्यात कशी पडणार आहे हे गणिताद्वारे मांडत आहेत. यावेळी निवडणुका चुरशीच्या झाल्याने खरा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. प्रचाराचा गजबजाट संपला असला तरी सर्वत्र नागरिकांत तीच चर्चा सुरू आहे. तर उमेदवार आपला हिशेब सादर करण्याच्या कामात गुंतले असून प्रत्यक्ष मात्र किती कसरत झाली, आपण कसा खर्च केला याचा ताळमेळ घालत आहेत. तर अनेक जण सर्वांची मनधरणी करता करता नाकी नऊ आलेले पुन्हा नको रे बाबा निवडणूक अशा मानसिकतेत आहेत.  

पंचायत समितीत पूर्वी चार राष्ट्रवादी, तर काँग्रेस व भाजपा प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल होते. तर तीन गटात दोन राष्ट्रवादी व एक काँग्रेस अशी स्थिती होती. यावेळी नेमके कोणाच्या पारड्यात अधिक वजन पडते ते निकालानंतरच कळेल. 

शेतीकामातही निवडणूकच
शहरात नोकरीच्या निमित्ताने असलेले अनेकजण मतदानानंतर फोनवरून गावाकडील मित्रांशी बोलताना निकालाचे अंदाज घेत आहेत. तर नातेवाईक, मित्रांची भेट झाली की, निकालाच्याच गप्पा रंगत आहेत. बाहेरगावचे मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट भेटल्यास आपल्याकडे काय स्थिती आहे, निवडून कोण येईल, कोणत्या पक्षाचा विजय होईल याचेच संवाद व चर्चा करताना अनेकजण दिसत आहेत. एकीकडे शेतीकामे सुरु असून दुसरीकडे निकालाच्या गप्पा रंगत आहेत. 

Web Title: jalkot zp election