साहेब ! पहिले बोगस बियाणं, त्यानंतर अतिवृष्टीने पिकांसह जमिनही खंगाळून नेली, मदत करा, मायबाप !  

jalna pahni.jpg
jalna pahni.jpg

बदनापूर (जालना) : साहेब..आमच्याकडे अनेकदा अतिवृष्टी झाली. त्यात बियाणे, पिके वाहून गेली, जमिनीही खंगाळून माती वाहून गेली. फळबागा उध्वस्त झाल्या. तीन शेतकरी व जनावरे वाहून गेलेत. नुकसानीचे केवळ पंचनामे होत आहेत. मात्र प्रत्यक्षात मदतीच्या नावाखाली एक छदामही मिळाला नाही. साहेब...आमचे खूप मोठे नुकसान झाले हो. आम्हाला तातडीची मदत द्या. असा आर्त टाहो जालना जिल्ह्यातील रोषणगाव व धोपटेश्वर येथील शेतकऱ्यांनी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याकडे शनिवारी (ता. तीन) अतिवृष्टीग्रस्त पिकांच्या पाहणी दौऱ्यात फोडला.

यावेळी श्री. दरेकर यांनी पिकांचे वेगळे आणि माती वाहून गेल्याचे वेगळे निकष लावून पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठवा, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो. या उपर मदतीला उशीर होत असेल तर भाजपच्या वतीने शासनाविरुद्ध कडवा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

श्री. दरेकर सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा करीत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी शनिवारी बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर आणि रोषणगाव शिवाराला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे व आमदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दौऱ्यात त्यांनी धोपटेश्वर शिवारातील रविराज शेळके, रोषणगाव शिवारातील बाबासाहेब खरात व मोहन हिवराळे यांच्या शेताला भेट देऊन अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या थैमानीची व्यथा मांडली.

या पाहणीदरम्यान तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के,  भास्करराव दानवे, राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, भीमराव भुजंग, गणेश कोल्हे, वसंत जगताप, भगवान मात्रे, तात्यासाहेब मात्रे, पद्माकर जऱ्हाड,नगराध्यक्ष प्रदीप साबळे, जगन्नाथ बारगजे, सत्यनारायण गेलडा, हरिश्चंद्र शिंदे, विष्णू कोल्हे, नंदकिशोर शेळके, विलास जऱ्हाड, गजानन काटकर, पंढरीनाथ शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकर्यांचा टाहो...! 

  • शेतकरी बाबासाहेब खरात म्हणाले की, माझ्याकडे १४ एकर शेती आहे, मात्र यंदा अतिवृष्टीत सर्व पिके वाहून गेली. त्यामुळे नांगरणी पासून केलेला सर्व खर्च वाया गेला. काही ठिकाणी पंचनामे झाले तर काही ठिकाणी पंचनामेही झाले नाहीत. मात्र अद्याप आम्हाला कवडीचीही मदत मिळालेली नाही. 
  •  
  • विष्णू कोल्हे म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त फळपिकांचे सरसकट पंचनामे झाले नाहीत. फळपिकांच्या विम्याचा मोबदला मिळत नाही. जालना जिल्हा जाणीवपूर्वक फळपीक विमा योजनेतून वगळण्यात आला आहे. बागतदार शेतकऱ्यांना विम्याचे २०१७ - २०१८ चेही पैसे मिळाले नाहीत.
  •  
  • नंदकिशोर शेळके म्हणाले की, धोपटेश्वर येथील पाच द्राक्ष उत्पादकांना १२ हजार विम्याची रक्कम भरल्यानंतर केवळ आठ हजार रुपये मिळाले आहेत. तर दुसरीकडे  द्राक्ष नुकसानीचा मोबदला लाखात देण्यात आला. नुकसान आमच्याकडेही झालेले असताना असा अन्याय कसा? असा प्रश्न मांडला.
  •  
  • संतोष वरकड म्हणाले की, २४ जूनच्या अतिवृष्टीत पिकेच काय तर मातीही वाहून गेली. पुरात ३ शेतकरी आणि काही दुधाळ जनावरेही वाहून गेलीत. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीच मदत मिळालेली नाही. एकूणच अशा धोरणामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त अवस्थेत जात आहेत. त्यामुळे शासनाने पिकांसह माती, जनावरे वाहून गेल्याची स्वतंत्र मदत द्यावी, केवळ पिकांची मदत शेतकऱ्यांना परवडणारी नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी श्री. दरेकर यांच्याकडे केली.

अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात पिकांसह माती, जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे पंचनामे करताना केवळ बाधित पिकांचे पंचनामे करू नयेत, त्यासोबत खंगाळलेल्या जमिनी, वाहून गेलेली माती, पशुधन असे एकूण शेतीच्या नुकसानीचे स्वतंत्र निकष ठरवावे. अर्थात नुकसानीचा अहवाल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार आहे. मात्र अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आणि भरीव मदत देतांना दिरंगाई होत असेल तर भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही.
प्रविण दरेकर (विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद)

बदनापूर मतदार संघात यंदा पावसाने अतिरेक केला. त्यामुळे खरीप पिके पुरती उध्वस्त झाली आहे. शेतातील माती, बंधारे वाहून गेले. एकूणच नुकसानीचा आवाका मोठा असल्याने शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत द्यावी. भाजप सरकारच्या काळात पूर, वीज पडल्यावर म्हणजे नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबाला अवघ्या ४८ तासांत ४ लाख रुपयांची मदत दिली जात होती. मात्र आता नुकसान होऊन तीन - चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप मदत दिली गेली नाही. शासनाने पिकांसह कृषिक्षेत्राच्या इतर बाबींच्या नुकसानीची वेगळी नोंद घेऊन भरपाई द्यावी.
आमदार नारायण कुचे

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com