जायकवाडी मुख्य जलवाहिनी फुटली, जालना शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

उमेश वाघमारे
Wednesday, 28 October 2020

जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जालना-जायकवाडी मुख्य जलवाहिनी पैठण-पाचोड रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून बुधवारी (ता.२८) फुटली आहे.

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जालना-जायकवाडी मुख्य जलवाहिनी पैठण-पाचोड रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून बुधवारी (ता.२८) फुटली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस जायकवाडी येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला जायकवाडी धरण व घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होतो. सध्या घाणेवाडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे नवीन जालना भागाचा पाणीप्रश्न संपला आहे. तर जुना जालना भागाला पैठण येथील जाकयवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जोतो.

संघर्ष अन् राजकारण ऊसतोड मजुरांच्या फडात, भाजपात

यंदा जाकवाडी धरण ही पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा प्रश्न संपुष्टा आला आहे. मात्र, जालना-जायकवाडी मुख्य जलवाहिनी बुधवारी पैठण शहराजवळ फुटली आहे. पैठण ते पाचोड रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. या रस्त्याचे काम कल्याण टोलवेस यांना देण्यात आले आहे. या रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जालना-जायकवाडी मुख्य जलवाहिनी बुधवारी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

दुसरीकडे जलवाहिनी फुटल्याने नगरापालिकेने जायकवाडी धरणातून पाणी उपसा करणारे पंप बंद केले आहेत. मात्र, जलवाहिनी पाण्याने भरलेली आहे. त्यामुळे जलवाहिनीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी जलवाहिनी दुरूस्तीच्या कामाला चार ते पाच दिवस लागणार असल्याचे जालना नगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस जालना-जायकवाडी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

 

पैठण-पाचोड रस्त्याचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेस या कंत्राटादाराकडून जालना-जायकवाडी जलावाहिनी फुटली आहे. जलवाहिनी पाण्याने भरलेले असून ती मोकळी होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस जालना शहराला जायकवाडी धरणातून होणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
- राजेश बगळे, पाणीपुरवठा अधिकारी, नगरपालिका, जालना.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna-Jayakwadi Water Supply Line Leaked Jalna News