जालन्याचे ऊसतोड मजूर उस्मानाबादमध्ये अडकले 

उमेश वाघमारे 
रविवार, 29 मार्च 2020

सेवली येथील काही ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अडकले आहेत. या २२ मजुरांना कळंब शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अलगीकरणात ठेवले आहे. 

जालना -  तालुक्यातील सेवली येथील काही ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अडकले आहेत. या २२ मजुरांना कळंब शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अलगीकरणात ठेवले आहे. 

जालना तालुक्यातील सेवली येथील ऊसतोड मजूर सोलापूर येथील साखर कारखान्याला गेले होते. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापू 

राज्य शासनाकडूनही मजूर, कामगार यांचे स्थलांतर थांबविले आहे. त्यामुळे सोलापूर येथील कारखान्यावरून जालना जिल्ह्यातील सेवली येथे परत येत असताना या २२ ऊसतोड मजुरांची गाडी कळंब तालुक्यात अडविण्यात आली.

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

त्यानंतर या २२ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर कळंब तहसीलदार यांनी त्यांना अलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कळंब शहरातील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले आहे. या ऊसतोड मजुरांसोबत महिला, आठ लहान मुलेदेखील आहेत. 

शासनाच्या आदेशानुसार मजुरांचे स्थलांतरबंदी आहे. त्यामुळे आहेत त्या ठिकाणी त्या मजुरांची तेथील प्रशासन राहण्यासह जेवणाची व्यवस्था करेल. 
- निवृत्ती गायकवाड, 
निवासी उपजिल्हाधिकारी, जालना. 

जालना तालुक्यातील सेवली येथील २२ ऊसतोड मजूर आमच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची आरोग्य तपासणी केली असून, कोरोनाचे लक्षणे आढळून आले नाहीत. त्यांना कळंब येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले असून, त्यांच्या जेवणाची प्रशासन व्यवस्था करणार आहे. 
- मंजूषा लटपटे, 
तहसीलदार, कळंब 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna laborers get stuck in Osmanabad