Jalna : पितृपक्षानिमित्त मनोरुग्णांना वस्त्रांसह भोजनसेवा

शिक्षिका वैशाली फोके यांचा पुढाकार
Jalna
Jalnasakal

घनसावंगी : पितृपक्ष पंधरवड्यानिमित्त पूर्वजांचे स्मरण केले जाते. यानिमित्त समाजातील वंचित, गरजू, मनोरुग्णांची सेवाही घडावी, यासाठी अनेकजण कार्य करतात. शिक्षिका वैशाली फोके यांनी यानिमित्त मनोरुग्णांना वस्त्रांसह भोजनसेवा दिली. समाजाने वंचित घटकांसाठी या काळात कार्य करावे हा संदेशही दिला.

पितृपक्ष पंधरवड्याचा काळ हा पूर्वजांच्या स्मरणाचा. त्यांनी केलेले कार्य, त्यांचा आदर्श समोर ठेऊन समाजात वाटचाल करण्याचा. सामाजिक बांधीलकी तसेच कृतज्ञता जपण्याचा. ही बाब डोळ्यासमोर ठेऊन झिरपी येथील रहिवासी व सध्या रामनगरच्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली फोके यांनी अंबड तालुक्यातील शहापूर-दाढेगाव परिसरातील मनमंदिर प्रकल्पातील मनोरुग्णांसाठी पितृपक्ष पंधरवड्यात काहीतरी करण्याचा निर्धार केला. त्यानुसार प्रकल्पाच्या सारिकाताई पवार आणि माधव पवार या दांपत्यासोबत संपर्क साधला.

त्यानुसार गुरुवारी (ता.२२) त्यांनी मनमंदिर प्रकल्प गाठला. केवळ पाहुण्याच्या भूमिकेत न राहता वैशाली यांनी प्रकल्पात स्वयंपाकाच्या कामात मदत केली. मनोरुग्णांसाठी स्वतः जेवण वाढले. त्यांच्यासोबत आपुलकीने संवाद साधला. आप्त- नातेवाईक आज सोबत नाहीत, अशा मनोरुग्णांना या संवादाने भरून आले.

समाजातील वंचित अशा मनोरुग्णांसाठी काहीतरी करावे ही भावना होती. पितृपक्ष पंधरवड्यानिमित्त आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना वंचित, गरजूंचा विचार व्हावा, त्यांना दिलासा मिळावा असे वाटले.त्यातून मनोरुग्णांसाठी जेवण व कपडे दिले. खरेतर मंगलकार्य, वाढदिवस, पुण्यतिथी अशा निमित्ताने असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत.

- वैशाली फोके शिक्षिका, रामनगर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com