जालना रस्त्याचे भाग्य  ‘काँक्रिट’मय!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रस्त्याला विस्तारून सर्व्हिस रोडसह चकचकीत करण्याचा प्रस्ताव मागे पडला आहे. तथापि, विद्यमान केंब्रिज शाळा ते नगर नाका दरम्यानच्या रस्त्याचे भाग्य ‘काँक्रिट’मय होणार आहे. दोनशे कोटींच्या या प्रस्तावित कामात दोन उड्डाणपूलही औरंगाबादकरांच्या पदरात पडणार आहेत. 

औरंगाबाद - शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रस्त्याला विस्तारून सर्व्हिस रोडसह चकचकीत करण्याचा प्रस्ताव मागे पडला आहे. तथापि, विद्यमान केंब्रिज शाळा ते नगर नाका दरम्यानच्या रस्त्याचे भाग्य ‘काँक्रिट’मय होणार आहे. दोनशे कोटींच्या या प्रस्तावित कामात दोन उड्डाणपूलही औरंगाबादकरांच्या पदरात पडणार आहेत. 

शहरवासीयांसाठी महत्त्वाचा असलेल्या जालना रस्त्याला नवी झळाळी देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केल्यानंतर केंद्राने २०१५ मध्ये सुमारे चारशे कोटींची घोषणा केली होती. त्यावर तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी महापालिकेच्या असहकाराने रद्द करावी लागली असल्याने या रस्त्याच्या विस्ताराचा विचार ‘एनएचएआय’ने सोडून देत केवळ काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव दिल्लीला धाडला आहे. या चौदा किलोमीटरच्या रस्त्यासाठी २०० कोटींच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या अहवालाचा सकारात्मक विचार सध्या रस्ते विकास मंत्रालय करीत असल्याची माहिती नितीन गडकरी यांच्या पत्रकार परिषदेत शनिवारी (ता. चार) देण्यात आली. या रस्त्यावर दोन उड्डाणपुलांचा विचार केला जात असून, त्यांच्या जागा निश्‍चित केल्या गेलेल्या नाहीत; मात्र शहरातील भूसंपादन महापालिकेने केल्यावरच या कामाला आरंभ होणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले.

शहरातील रस्ते, माझी जबाबदारी नाही... 
शहरातील रस्ते ही केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरणाची जबाबदारी नाही, असे सांगत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सादर केलेला एक हजार प्रस्ताव धुडकावून लावला.  

केंद्रीय रस्ते विकास व वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे शनिवारी शहरात (ता. चार) आले होते. त्यांची महापौर श्री. घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी भेट घेतली. या वेळी शहरातील रस्ते कामांसाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली. बीड बायपास, शहराला जोडणारे १८ खेड्यांतील रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. गडकरींनी हे निवेदन ठेवून घेतले. शहरातील रस्ते ही महापालिकेची जबाबदारी असून, केंद्राकडून निधी मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

रस्त्यांबाबत...
केंद्राकडून सार्वजनिक बांधकाममार्फत (एनएच) १४७२ किमीची ३२ कामे सुरू. 
मराठवाड्यातील ७७२६ कोटींची कामे मंजुरीस्तरावर. 
पूर्वी ९३८ किमीचे राष्ट्रीय महामार्ग आता २३४८ किमी एवढे. 
झाल्टा फाटा ते एनएच २११ रस्ता चारपदरी करण्याचे निर्देश. 
बाय बॅक करून बीड बायपास ‘एनएचएआय’ला मिळाल्यावरच काम. 
दौलताबाद तटबंदीलगतच्या बायपासला याच वर्षात मंजुरी. 
औट्रम घाटाचा बोगदा ५००० कोटींचा, लवकरच निविदा प्रक्रिया. 
एनएचमार्फत २५५ किमी नूतनीकरणासाठी १०७ कोटी मंजूर. 

Web Title: jalna road Will be concrete road