मराठा, मुस्लिम व धनगरांना आरक्षण मिळावे - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

जामखेड - सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत केली होती. मात्र, आजपर्यंत शंभराहून अधिक बैठका होऊनही आरक्षणाचा निर्णय झाला नाही. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस मराठा, मुस्लिम व धनगर या तिन्ही समाजांना आरक्षण मिळावे, या भूमिकेबरोबर असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी दिली.

पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुळे यांनी आज चौंडी येथे येऊन दर्शन घेतले. त्या वेळी त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, 'या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव नाही. ते सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, म्हणून त्यांना शिवार संवाद साधण्याची केविलवाणी वेळ आली आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. मात्र, कर्जमाफीचा निर्णय घेण्यास सरकार तयार नाही. या सरकारला नेमकी कधी जाग येईल?''

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ राहील, असे सांगून सुळे म्हणाल्या, की कर्जमाफीनंतर जिल्हा बॅंकांना फायदा होईल. त्याचा अधिक लाभ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळेल, असा गैरसमज पसरविला जात आहे.

Web Title: jamkhed marathwada news maratha muslim & dhangar reservation