'जनधन'ची गाडी सुसाट

प्रकाश बनकर
गुरुवार, 26 एप्रिल 2018

औरंगाबाद - देशातील प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी बॅंक खाते असावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या जनधन योजनेचा कोट्यवधींनी लाभ घेतला. त्यात महाराष्ट्रही मागे नाही. राज्यात दोन कोटी 20 लाख ग्राहक "जनधन'चे खातेदार झाले असून, ते बॅंकिंग व्यवहार करीत आहेत. यातील पाच लाख 70 हजार 937 खाती झिरो बॅलन्सवर उघडण्यात आली आहेत. सर्व खात्यांत चार हजार 304 कोटी रुपये जमा आहेत.

"स्टेट लेव्हल बॅंकर्स' समितीच्या फेब्रुवारीअखेरीस झालेल्या बैठकीत यासंदर्भातील माहिती सादर झाली. राज्यात प्रमुख 34 सार्वजनिक बॅंकांच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यात सर्वाधिक 14 लाख खाती ठाणे जिल्ह्यात उघडण्यात आली. त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, नगरचा क्रमांक लागतो. औरंगाबाद जिल्ह्यात आठ लाख ग्राहकांनी खाती उघडली आहेत. एक कोटी 85 लाख 59 हजार 933 खाती (84 टक्के) "आधार'शी जोडलेली आहेत. 34 हजार खाती अद्याप "आधार'शी जोडलेली नाहीत. त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, खाते उघडण्याची प्रक्रिया नियमित सुरू ठेवली जाणार आहे.

खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड
"जनधन'मध्ये खाते उघडणाऱ्यांना ऑनलाइन व्यवहार करता यावा यासाठी "रुपे डेबिट कार्ड' देण्यात येत आहे. खाते उघडलेल्यांपैकी 69 टक्‍के ग्राहकांना कार्डची सुविधा देण्यात आली आहे. या कार्डचा वापर एटीएमप्रमाणे केला जातो.

राज्यातील स्थिती
- एकूण खाती ः 2,19,54,415
- ग्रामीण भागातील खाती ः 1,05,85,653
- महिला खातेदार ः 1,04,87,043
- पुरुष खातेदार ः 1,14,67,372
- सर्व खात्यांतील जमा रक्कम ः 4 हजार 304 कोटी

फोटो- एन80636
 

Web Title: jandhan scheme