‘जायकवाडी’वरील २२ धरणे तुडुंब

चंद्रकांत तारू
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पैठण - नाशिक जिल्ह्यातील झालेला पाऊस अन्‌ गोदावरीला आलेला पूर जायकवाडी धरणासाठी लाभदायी ठरला असून, धरणाच्या वरील भागांतील छोटी-मोठी अशी एकूण २२ धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे आता यापुढील होणाऱ्या पावसाचे पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार आहे. परिणामी पूर, महापुराचा संभाव्य धोका निर्माण होण्याची दाट शक्‍यता असून, पूर नियंत्रण पूर्वतयारीच्या बैठकीकडे तालुका प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

धरणाच्या नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे दोन-तीन दिवसांत ७० टक्‍क्‍यांपर्यंत जाईल, असा अंदाज धरण यंत्रणेच्या सूत्रांनी वर्तविला आहे. यानंतर पावसाचा जोर वाढला तर कोणत्याही क्षणी धरण शंभर टक्के भरेल. पाऊस थांबला नाही तर पैठण व गोदाकाठच्या एकूण २५ गावांना पुराच्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाला पूर नियंत्रण बैठक घेऊन आपत्कालीन कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. पूर्वतयारीसाठी पूर नियंत्रण बैठक तत्काळ घेणे गरजेचे आहे. 

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. पूर, महापुराचे नैसर्गिक संकट उद्‌भवल्यास प्रशासन ऐनवेळी काय उपाययोजना करून सामना कसा करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

दमदार पाऊस झाल्यास महापूर
भंडारदरा, करंजबन, वाघड, ओझरखेड, ओझरवेल, पालखेड, गंगापूर, गौतमी, काश्‍यपी, कडवा, भावली, मुकणे, नांदूर-मधमेश्‍वर, निळवंडे, मुळा, दारणा, पुणेगाव, तीसगाव, वालदेवी, आढळा, मानडोहळ, वाकी आदी छोटी-मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत, अशी माहिती धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. या धरणांतील पाणीसाठ्याचे प्रमाण शंभर टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे जर दमदार पाऊस सुरू झाला तर भरलेल्या धरणांतून सोडलेले पाणी पूरस्थिती निर्माण करणारे ठरणार आहे. धरण नियंत्रण व्यवस्थापन धरणात दाखल होत असलेल्या दैनंदिन पाणीपातळीची अद्ययावत नोंद करीत आहे. धरणाची यंत्रणा त्यांनी सज्ज ठेवली आहे. 

‘‘तालुका प्रशासन जायकवाडी येथील धरण यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहे. धरणाच्या वरील भागातील धरणे शंभर टक्के भरल्यामुळे कोणत्याही वेळी पूर येण्याची शक्‍यता आहे. लवकरच तालुका प्रशासनाची बैठक घेतली जाईल. जिल्हा प्रशासनाच्या पूर नियंत्रणाच्या मुख्य बैठकीबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवरून सूचना व आदेश नाहीत.’’ 
- महेश सावंत, तहसीलदार

Web Title: jayakwadi dam paithan news