जायकवाडीचे पाणी गोदापात्रात सोडावे

चंद्रकांत तारु
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरण कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्याकडे बुधवारी (ता. 11) केली आहे.

पैठण (जि.औरंगाबाद) : नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरण कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्याकडे बुधवारी (ता. 11) केली आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला आलेल्या पुरामुळे जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन सध्या धरण 92 टक्‍क्‍यांहून अधिक भरले आहे. गेल्या महिन्यात ता. 15 ऑगस्टला धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता; परंतु हे पाणी नंतर बंद करण्यात आले. आता गणेश विसर्जनासाठी नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, नगरपालिका स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यात गोदावरीत पाणी नसल्याचे दिसून आले. यानंतर नगरपालिकेने तहसीलदार महेश सावंत यांना याबाबतची माहिती पत्राद्वारे दिली. गोदापात्रात पाणी नसल्यामुळे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे, नागरिकांना गणपती विसर्जन करण्यात अडचण निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व पाणी सोडण्याची मागणी केली.

गोदाकाठच्या गावांनाही
होणार पाण्याचा लाभ

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे गोदाकाठच्या सुमारे चाळीसहून अधिक गावांतील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्याची नागरिकांची मागणी कायम आहे. आमदार संदीपान भुमरे यांनीही जिल्हा प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यामुळे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा लाभ गोदाकाठच्या गावांना मिळणार आहे. तहसीलदार महेश सावंत यांनी गोदाकाठच्या पाणीप्रश्‍नी दिलेल्या पत्रात ही बाब नमूद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi Dam Water To Be Govdavari River