‘जीवनधारा’कडून सूट की लूट?

योगेश पायघन
शुक्रवार, 7 जून 2019

सरसकट पाच टक्के सूट देण्यासाठी प्रयत्न - डॉ. रोटे
प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी तांत्रिक समितीच्या प्रमुख डॉ. माधुरी कुलकर्णी, औषधभंडारच्या मुख्य फार्मासिस्ट प्रवीणा मोरे, प्रभारी अधीक्षक डॉ. विकास राठोड यांची बैठक घेतली. बैठकीत तक्रारींचा चिठ्ठाच समोर आला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे कारवाई अशक्‍यप्राय असल्याचे चर्चेअंती समोर आले. तथापि, सररकट पाच टक्के सवलत देण्यासंदर्भात ‘जीवनधारा’च्या मालकाशी बोलू, असे डॉ. रोटे यांनी स्पष्ट केले. एमआरपीपेक्षा जास्त किमतीत विक्री झाल्यास कारवाई होऊ शकते. मात्र, सवलत किती द्यावी यावर औषध प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी स्पष्ट केले.

घाटीत औषधींवर पाच, तर बाहेरच्या मेडिकलमध्ये दहा टक्‍क्‍यांहून अधिक सवलत
औरंगाबाद - छावणीत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या सुनंदा चंदेल यांना बुधवारी (ता. पाच) कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी त्यांना पोलिस कर्मचारी असलेले पती अनिल यांनी गुरुवारी (ता. सहा) घाटीत आणले.

एआरव्ही-एआरएसच्या तुटवड्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांना रेबीज अँटिसीरम इंजेक्‍शन बाहेरून खरेदी करायला लिहून दिले. त्यांनी घाटीतच असलेल्या ‘जीवनधारा’ मेडिकलवरून दोन इंजेक्‍शन खरेदी केले. त्यावर त्यांना १३ रुपयांची सूट देत ९५० रुपयांचे बिल मिळाले. परंतु, तीच कंपनी व त्याच बॅचचे दोन इंजेक्‍शन त्यांनी घाटीच्या बाहेरून खरेदी केले, तर कोणतीही सूट न मिळताही ८०० रुपयांना मिळाले. त्यामुळे दीडशे रुपयांनी महाग मिळालेल्या औषधीत सूट मिळाली की लूट झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अनिल चंदेल यांना आलेला लुटीचा हा अनुभव प्रातिनिधिक असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.  

घाटी परिसरात वर्ष २००९ मध्ये महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई या संस्थेला दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यात आली. तिथे जीवनधारा मेडिकल सुरू करण्यात आले. त्यासाठी अनेक अटी-शर्ती ठेवण्यात आल्या. त्यातील एक म्हणजे, शून्य ते पाच टक्‍क्‍यांपर्यंत सवलतीच्या दरात औषधी द्यावेत. शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना सवलत द्यावी, या मेडिकलवर अधिष्ठाता आणि तांत्रिक समितीने लक्ष द्यावे, असे आदेशात म्हटलेले आहे. मात्र, कोणत्या औषधावर नेमकी किती सवलत द्यायची, असे आदेशात स्पष्ट नसल्याने ते जीवनधारा मेडिकलच्या पथ्यावर पडते आणि नाममात्र सूट देत विक्री सुरू आहे. यात जीवनधारा मेडिकल कायद्याचे उल्लंघन करीत नसले तरी खासगी मेडिकलला जर स्वस्तात औषधी विक्री परवडत असेल तर घाटीतल्या मेडिकलवर तुलनेत महाग औषध विक्री का? असा सवाल खिशाला कात्री बसलेले रुग्ण, नातेवाईक विचारत आहेत. तसेच घाटी व डीएमईआरच्या भूमिकेवरही शंका उपस्थित होत आहे. 

अमृत व जेनेरिकची प्रतीक्षा कायम 
घाटीत अमृत फार्माचे आऊटलेट सुरू करण्यासाठी जानेवारी २०१८ मध्येच जागा दिली गेली. मात्र, देशभर सुरू झालेले आऊटलेट अद्याप घाटीत सुरू होऊ शकले नाही. तर जेनेरिक मेडिकलसाठीही जागा देऊनही ती सुविधाही अद्याप नाही. त्यामुळे सध्या घाटीतील रुग्णांना परिसराबाहेरच औषध खरेदीसाठी धाव घ्यावी लागते. यात ज्यांना माहिती नाही ते लुटीचे शिकार होत आहेत.

सद्यःस्थिती बिकट 
घाटीत दोन वर्षांपासून औषध व सर्जिकल साहित्याचा पुरवठा व खरेदी प्रभावित झाली. गेल्या सहा महिन्यांपासून अडीचशे औषधांच्या मागणीपैकी १४३ महत्त्वाच्या औषधींपैकी केवळ १०५ औषधी आहेत. तर दीडशेपैकी केवळ पाच सर्जिकल साहित्य घाटीत आहे. त्यामुळे दीड हजारावर आंतरुग्णांचे बहुतांश उपचार हे प्रिस्क्रिप्शनवरच सुरू आहेत. तर ४० प्रसूती, २० सिझेरियन, वीसहून अधिक सर्जरीसाठीचे साहित्य बाहेरूनच खरेदी करावे लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jeevandhara Medical Concession or Loot