जेट एअरवेजचे विमान पुन्हा मुंबईला फिरले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

औरंगाबाद - सोमवारी (ता. 16) सायंकाळी अचानक खराब झालेल्या वातावरणामुळे चिकलठाणा विमानतळावर आलेले जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद विमान आकाशात घिरट्या मारून पुन्हा मुंबईला परत गेले. हे विमान रोज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास येथे येते. त्यानंतर ते सायंकाळी 5.20 वाजता मुंबईसाठी उड्डाण करते. सोमवारी दुपारी शहरात जोरदार वारे वाहत होते. त्यातच पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे आलेल्या विमानाला हवेतच तरंगावे लागले. वादळी वाऱ्यामुळे विमानाला लॅंडिंग करणे शक्‍य झाले नाही. त्याने शहर आणि परिसराच्या आकाशात बराच वेळ घिरट्या मारल्या; परंतु तरीही लॅंडिंगसाठी परवानगी न मिळाल्याने अखेर ते मुंबईला परत न्यावे लागले. याचा फटका मुंबईहून आलेल्या प्रवाशांना बसला.
Web Title: jet airways plane return to mumbai