धक्कादायक! तुळजाभवानीचे ऐतिहासिक दागिने गायब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

- तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान आणि अतिप्राचीन दागिन्यांचा होतोय गैरव्यवहार. 

उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान आणि अतिप्राचीन दागिन्यांचा गैरव्यवहार होत असून, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुजारी किशोर गंगणे आणि ऍड. शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पुजारी गंगणे यांनी शुक्रवारी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मंदिर संस्थानकडे दुर्लभ, दुर्मीळ आणि प्राचीन नाणी आहेत. ज्यांची किंमत होऊ शकत नाही. अशी 71 नाणी होती. यामध्ये बिकानेर, औरंगजेब, डॉलर, चित्रकूट, उदयपूर संस्थान आदी प्रकारची नाणी चार्जपट्टीत आलेली नाहीत. त्यामुळे ही नाणी गेली कुठे? ज्याच्या ताब्यात अशी नाणी होती, त्याची चौकशी करून त्याला शिक्षा करावी. 

स्ट्रॉंग रूममध्ये देवीचे अनेक मौल्यवान तसेच ऐतिहासिक दागिने आहेत. या स्ट्रॉंग रूमच्या चाव्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे काही कुलपांच्या चाव्या कशा गायब झाल्या, याची चौकशी होणे गरजेचे आहे. देवीच्या दागिन्यांची आणि वस्तूंची नोंद चार्जपट्टीत असते. मात्र, महंत तसेच सेवेकऱ्याकडे असलेल्या वस्तूंची नोंदच चार्जपट्टीत केलेली नाही. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही तक्रारीत म्हटले आहे. 

अनेक भक्त देवीला श्रद्धेने दागिने देतात. यामध्ये अदलाबदल होऊ शकते. त्यासाठी अशा वस्तूंची नोंद होणे गरजेचे आहे. अशा वस्तूंची नोंद न ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र, यामध्ये अनेक जण प्रवेश करतात. त्यांना कोणी जाऊ दिले? सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासून अशा लोकांवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पूर्वीच्या धार्मिक व्यवस्थापकाने सूत्रे देताना मंदिरातील पुरातन मूर्ती, तसेच साहित्याची मोजदाद करून नवीन व्यवस्थापकाला त्याची यादी देणे गरजेचे आहे.

पुरातन मूर्ती, वस्तूचे नाव, त्याचे वजन आदी बाबींचा यामध्ये समावेश असावा लागतो. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, याची जबाबदारी निश्‍चित करून कारवाई करावी, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewelry missing of Tuljabhawani Temple