जिंतूर तालुका : १०१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरु

राजाभाऊ नगरकर
Thursday, 24 December 2020

रणनीती ठरविण्यासाठी गावोगावी होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठका, निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले संभाव्य उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत असल्याने कडाक्याच्या थंडीतही ग्रामीण भागातील वातावरण तापू लागले आहे.

जिंतूर-  गावपातळीवरील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची बुधवारपासून रणधुमाळी सुरू झाली. रणनीती ठरविण्यासाठी गावोगावी होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठका, निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले संभाव्य उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत असल्याने कडाक्याच्या थंडीतही ग्रामीण भागातील वातावरण तापू लागले आहे.

वरिष्ठ पातळीवरील राजकारणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका महत्त्वाच्या समजल्या जात असल्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षांतर्फे या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची ताकद वाढविण्याच्यादृष्टीने जास्तीत जास्त ग्रामपंचायती पक्षाच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीचा भर असतो. त्यामुळे गावपुढाऱ्यांनाही महत्त्व आले आहे.

जिंतूर तालुक्यातील १३६ पैकी १०१ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबरमध्ये संपली. परंतु लॉकडाऊनमुळे निवडणूक प्रक्रिया लांबली होती. लॉकडाऊन शिथील होऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्याने निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या ३१७ प्रभागातील ८०९ सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा - नांदेड : सोने विक्रीचे आमिष दाखवून रोख रक्कम लुटली; ठगसेन किनवट पोलिसांच्या कोठडीत -

यापैकी चारठाणा व बोरी या मोठ्या १७ सदस्यसंखेच्या ग्रामपंचायती आहेत. त्याखालोखाल भोगाव, आडगाव (बा.), सावंगी (म्हा.) प्रत्येकी १३ व शेवडी आणि अंबरवाडी या ११ सदस्यसंख्या असलेल्या आहेत. तर २९ ग्रामपंचायती नऊ सदस्यांच्या असून उर्वरित प्रत्येकी सात सदस्यसंख्येच्या आहेत.

प्रशासनाची जय्यत तयारी

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, मोकळ्या वातावरणात निर्भयपणे निपक्ष वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने दोन अथवा तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून एकूण ८२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शिक्षकांसह पंचायत समिती, पाणीपुरवठा व क्रषी विभागाच्या समावेश असेल.

येथे क्लिक करानांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू -

दरम्यान,नामांकन पत्र व मतदार याद्या खरेदी करण्यासाठी पेनल प्रमुख तसेच आपक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांनी गर्दी केल्याचे चित्र बुधवारी तहसील कार्यालयात दिसले. बुधवार (ता. २३) पासून नगरपरिषदेच्या अबूल कलाम सभागृहात उमेदवारी अर्ज स्विकारण्यास प्रारंभ झाला असून ३० डिसेंबर अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख राहील.ता. चार जानेवारीला अधिक्रत उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावेळी निवडणूक होणाऱ्या ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र समोर येईल.

तालुक्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ग्रामपंचायतींपैकी चारठाणा व बोरी या मोठ्या १७ सदस्यसंखेच्या ग्रामपंचायती आहेत. त्याखालोखाल भोगाव, आडगाव (बा.),सावंगी (म्हा.) प्रत्येकी १३ व शेवडी,आणि अंबरवाडी या ११ सदस्यसंख्या असलेल्या आहेत. तर २९ ग्रामपंचायती नऊ सदस्यांच्या असून उर्वरित प्रत्येकी सात सदस्यसंख्येच्या आहेत.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jintur taluka: 101 gram panchayats are in full swing parbhani news