सिद्धार्थ उद्यानात इस्राईल, मलेशियातून येणार जिराफ, झेब्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जिराफ आणि झेब्राची जोडी असावी; यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र देशभरात कुठेही या प्राण्यांची जोडी मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. यामुळे आता इस्राईल किंवा मलेशियातून जिराफ आणि झेब्राची जोडी आणण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे.

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जिराफ आणि झेब्राची जोडी असावी; यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र देशभरात कुठेही या प्राण्यांची जोडी मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. यामुळे आता इस्राईल किंवा मलेशियातून जिराफ आणि झेब्राची जोडी आणण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे.

यासाठी आयुक्‍तांनी सकारात्मकता दाखवली असून, जिराफ, झेब्राच्या बदल्यात प्राणिसंग्रहालय प्रशासनाने वाघ देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात जिराफ व झेब्रा या प्राण्यांची उणीव भासत आहे. म्हणून, या दोन्हींची जोडी आणण्यासाठी प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने या प्राण्यांना राहण्यासाठी किती जागा लागेल, त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते, त्यांचा आहार काय आणि कसा असतो? याचा अभ्यास करण्यासाठी नुकतेच महापालिकेचे पथक हैदराबाद व विशाखापट्टणम येथील प्राणिसंग्रहालयांना भेट देऊन परतले. या दोन प्राण्यांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती मिळाली; मात्र जिराफ, झेब्राची जोडी मिळण्याची आशा मात्र मावळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणांहून जिराफ मिळणार नाही, एवढेच काय देशभरातील कोणत्याही प्राणिसंग्रहालयात जिराफ व झेब्राची जोडी उपलब्ध नाही. तेथील व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही प्राण्यांच्या जोड्या इस्राईल किंवा मलेशियातून मिळू शकतील. या दोन्ही जोड्यांना विमानाने आणावे लागणार आहे. त्यासंदर्भातील परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. विमानाने त्यांना आणण्याचा खर्च 14 ते 18 लाख रुपये लागणार आहे. जिराफ व झेब्रा यांची अडीच ते तीन महिन्यांची पिले आणावी लागणार आहेत. दोन टप्प्यांत विमान प्रवास करावा लागणार आहे. या संदर्भात आयुक्‍तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिराफ व झेब्राच्या बदल्यात पिवळ्या वाघाची जोडी देण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हत्तीणींचा तिढा सोडवायचा कसा
विशाखापट्टणम येथे हत्ती सरस्वती व लक्ष्मी यांना पाठवण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासन तयार आहे; मात्र विशाखापट्टणम येथील प्रशासन केवळ लक्ष्मीला नेण्यास तयार आहे. कारण सरस्वतीचे वय झालेले असल्याने तिला प्रवासाची दगदग सहन होणार नाही, यामुळे केवळ लक्ष्मीला नेण्याची तयारी दर्शवली आहे; परंतु लक्ष्मी मस्तवालपणे राहते. ती आईला सोडून राहू शकत नाही, तिथे एकटीलाच नेले तर ती राहू शकणार नाही, यामुळे या दोघींची ताटातूट कशी करावी असा प्रश्‍न सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनापुढे पडला आहे.

Web Title: jirafa & zebra in siddharth garden