जुगाड टेक्‍नॉलॉजी’ची कार्यशाळेने घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या ‘जुगाड टेक्‍नॉलॉजी’ने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे ‘सकाळ’ने उघड केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. या प्रकरणाची आरटीओ कार्यालयानंतर विभागीय कार्यालयानेही दखल घेऊन प्रत्येक डेपोला ‘जुगाड’ केलेल्या बसगाड्यांचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या ‘जुगाड टेक्‍नॉलॉजी’ने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे ‘सकाळ’ने उघड केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. या प्रकरणाची आरटीओ कार्यालयानंतर विभागीय कार्यालयानेही दखल घेऊन प्रत्येक डेपोला ‘जुगाड’ केलेल्या बसगाड्यांचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

एसटी महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे एसटी बसगाड्यांची दुरवस्था झाली आहे. अत्यंत कमी दराची असलेली स्प्रिंग नसल्याने वाहनचालकांना ॲक्‍सेलेरेटरला रबर बांधून शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. अशा बसगाड्यांची संख्या किमान पाच ते दहा टक्के आहे. प्रवाशांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ ‘सकाळ’ने मालिकेद्वारे उघड केला. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दखल घेऊन २५ एप्रिलरोजी एसटीच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अशा बसगाड्या आढळल्यास संबंधित वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस प्रमाणत्र) रद्द करण्याचा इशारा दिला होता. या पत्राची दखल घेऊन एसटीच्या विभागीय कार्यशाळेचे यंत्र अभियंता के. टी. सोमवंशी यांनी औरंगाबाद आगार क्र. १ व २ तसेच पैठण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सोयगाव या सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन जुगाड केलेल्या बसगाड्यांचा शोध घ्यावा, त्या दुरुस्त करून त्याचा अहवाल तातडीने पाठवावा, असे आदेश दिले आहेत.

साडेसहाशे बसगाड्यांचा ताफा  
औरंगाबाद विभागामध्ये तब्बल ६३४ बसगाड्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद आगार क्र. १ मध्ये ११६, आगार क्र. २ मध्ये १५५, पैठण ५८, सिल्लोड ६६, वैजापूर ५१, कन्नड ५५, गंगापूर ५९, सोयगाव ३४ अशा ५९४ बस आहेत. या शिवाय ४० बसगाड्या या अतिरिक्त ठेवल्या आहेत. या ताफ्यामध्ये २७ शिवशाही बस आहेत. पाच एसटी महामंडळाच्या व्हॉल्व्हो, तर तीन भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत. शिवाय पाच शीतल एसी आणि ५८ निमआराम बसचा समावेश आहे. 

एसटीच्या ॲक्‍सेलरेटरला छोटी स्प्रिंग असते, ही स्प्रिंग डेपो मॅनेजरलाही खरेदी करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे पत्र पाठवून आढावा घेण्यास सांगितले आहे. अशा पद्धतीने बस चालवणे निश्‍चितच धोकादायक आहे. 
के. टी. सोमवंशी, यंत्र अभियंता (चालन)

Web Title: Jugad Technology workshop ST Depo