लिपिक देतोय गेल्या 43 वर्षांपासून पंतप्रधान निधीसाठी पैसे

Junior Clerk has been paying for the Prime Minister Fund from last 43 years
Junior Clerk has been paying for the Prime Minister Fund from last 43 years

औरंगाबाद : गेल्या 43 वर्षांपासून कशाचीही अपेक्षा न ठेवता पंतप्रधान निधीसाठी दरमहा शंभर रुपये पाठविण्याचा विक्रम गोरखनाथ विश्‍वनाथ आव्हाळे यांनी केला आहे. 

आघुर (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील गोरखनाथ हे 1976 ला महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले. त्यावेळी त्यांना पंतप्रधान निधीबाबत माहिती मिळाली. या निधीचा गैरवापर होत नाही. त्याचा रीतसर हिशेब ठेवला जातो. निधी दिल्यानंतर त्याची रीतसर पोचपावती मिळते. याची खात्री केल्यानंतर त्यांनी पगारातून दरमहा शंभर रुपये पंतप्रधान निधीसाठी कापून घ्यावेत, असे पत्र सरकारला पाठविले. त्यानंतर दरमहा त्यांच्या पगारातून शंभर रुपये पाठविण्यास सुरवात केली. 2009 मध्ये आव्हाळे हे निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी दरमहा शंभरऐवजी 'डीडी'द्वारे वर्षाला बाराशे रुपये निधी पाठविण्यास सुरवात केली. निवृत्तीनंतरही ते स्वतः बॅंकेत जाऊन 'डीडी'द्वारे पैसे भरतात. 

नरसिंहरावांकडून उल्लेख -
1992 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव औरंगाबादेत आले असता, त्यांनी भाषणातून एक लिपिक पंतप्रधान निधीसाठी योगदान करीत असल्याचा उल्लेख केला होता. देशाच्या पंतप्रधानाने केलेला उल्लेख गौरवास्पद आहे. 

मुलांनाही शिकवण -
गोरखनाथ आव्हाळे यांची दोन मुले व एक सून डॉक्‍टर आहेत. दोन्ही मुलांच्या लग्नात त्यांनी हुंडा घेतला नाही. किती पैसे कमावले यापेक्षा किती सत्कारणी लावले हे ते मुलांना विचारतात. पैसे कमाविण्यापेक्षा चांगलं माणूस बना व लोकांना मदत करा, असा त्यांचा आग्रह असतो. पंतप्रधान निधीला मदत देण्याचा वडिलांचा वारसा पुढे चालविणार असल्याचे मुलगा संतोष आव्हाळे यांनी सांगितले. 

अडचणी आल्या; पण खंड नाही -
सुरवातीच्या काळात श्री. आव्हाळे यांचा पगार सातशे रुपये होता. त्यामुळे शंभर रुपये तेव्हा मोठी रक्कम होती. खासगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या तरी त्यांनी निधी पाठविण्यात खंड पडू दिला नाही. 43 वर्षांपासून आव्हाळे न चुकता निधी पाठवीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com