जणू होता मरणाचाच 'डेमो' !

मनोज साखरे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

रेल्वेच्या धक्क्यात दुचाकीची पेट्रोल टाकी फुटल्याने पेट्रोल रूळावर सांडले. पण रेल्वेचे चाक व रुळाशी पेट्रोलचा संबंध आला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टाळली असे श्रीमंता गोर्डे पाटील यांनी सांगितले.

औरंगाबाद :  सकाळी सातची वेळ, डेमो रेल्वेगाडी सुसाट येत होती..त्याचवेळी चुलत्या पुतण्याची दुचाकी रुळात अडकली. गाडीने संग्रामनगर फाटक सोडले. गाडी वळण घेताना अचानक दोघांना दिसली. मरण समोरून सुसाट येत असताना मॉर्निंग वॉक करणाऱ्याना हा प्रकार दिसला. त्यांनी जोरात आवाज देऊन दोघांना बाजूला घेतले अन..गाडी दुचाकी तुडवीत धाड.. धाड.. निघून गेली. पोटात गोळा आणणारा हा प्रसंग बुधवारी सकाळी सातला औरंगाबादेतील गेट क्रमांक.५४ जुना संग्रामनगर गेट (रेणुकामाता कमान समोर ) रेल्वे रुळावरून घडला.

करण जाधव व त्यांच्या चुलता रतन राम जाधव हे रेल्वे रुळावरून दुचाकी घेऊन जात होते. त्याचवेळी डेमोसमोरून येत होती. या ठिकाणी वळण असल्यामुळे रेल्वेचा वेग जास्तच असतो व समोरच्याना रेल्वे जवळ अलीनंतरच दिसते. याच ठिकाणी डेमो रेल्वे 20 फुटावर आली असता रेल्वे रुळावर मोटार सायकल अडकली. त्यावेळी येथे श्रीमंत गोर्डे पाटील,अँड आणासाहेब मुळे मॉर्नीग वॉक करीत होते. त्यांनी "दुचाकी सोडा अन..जीव वाचवा" अशी आरोळी ठोकत दोघांना सावध केले. अगदी जवळ रेल्वे येताच शिताफीने दोघांना त्यांनी बाजूला सारले. करण व त्याचा काका घाबरलेला अवस्थेत पळत सुटले दरम्यान दुचाकी रेल्वेने अर्धा किलोमीटर फरफटत नेली. श्रीमंत गोर्डे पाटील यांना करण यास अशोक सोनजे यांच्या मदतीने पकडले व त्यांना धीर देत समुपदेशन केले.

रुळावर सांडले पेट्रोल

रेल्वेच्या धक्क्यात दुचाकीची पेट्रोल टाकी फुटल्याने पेट्रोल रूळावर सांडले. पण रेल्वेचे चाक व रुळाशी पेट्रोलचा संबंध आला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टाळली असे श्रीमंता गोर्डे पाटील यांनी सांगितले.

करणच्या डोळयात पाणी...

आम्ही वाचलो..मृत्यू समोर होता. आमचा जीवही गेला असता हाडांचा चुराडा झाला असता, अशा भेदरलेल्या शब्दांत त्याने भावना व्यक्त करून यापुढे अशी चूक करणार नसल्याची त्याने सांगितले. अपघातग्रस्त दुचाकी रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

Web Title: Just like dead demo in Aurangabad