कळमनुरी, बाळापुरात नाभिक महामंडळातर्फे गरजूंना धान्य वाटप

संजय कापसे/ विनायक हेंद्रे
बुधवार, 25 मार्च 2020

नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २३) बंदमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरातील पंधरा सलून व्यवसायिक व कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो गोडतेल, एक किलो मूगदाळ, एक किलो तूरडाळ, मीठ पुडा या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कळमनुरी(जि. हिंगोली): कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शहर व परिसरातील सलून व्यवसायिकांनी मागील चार दिवसांपासून आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे व्यवसायातील गरीब कामगारांची आर्थिक अडचण पाहता नाभिक महामंडळाच्या वतीने कळमनुरी आखाडा बाळापूर, वारंगा फाटा येथील सलून व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूजन्य संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सलून व्यवसायिकांनी सतर्कता म्हणून मागील चार दिवसांपासून आपले सर्व व्यवसाय स्वतःहून बंद ठेवले आहेत. त्यातच आता राज्य शासनानेही लॉकडाऊन घोषित करत केवळ जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने उघडी ठेवण्याच्या सूचना पाहता शहरातील इतर सर्व व्यापार व दुकाने बंद आहेत. मात्र, शहरातील सलून व्यवसायिकांनी गुरुवारपासून (ता. १९) आपले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मागील पाच दिवसांपासून शहरातील सर्व सलून व्यवसायिकांनी स्वतःहून बंद पाळलेला आहे.

हेही वाचाहिंगोलीकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे : पालकमंत्री वर्षा गायकवाड

जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्याचा निर्णय

या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायामध्ये असलेल्या गरीब नाभिक बांधव व कामगारांची या बंददरम्यान झालेली आर्थिक ओढातान पाहता नाभिक महामंडळाचे पदाधिकारी रामराव सवणे, रेणुकादास वैद्य, नथू वाघमारे, शिवा सवणे, बाबूराव राऊत, प्रभाकर जाधव, जानकीराम वाघमारे, आनंद शास्त्री, रंगनाथराव गोरे, पंढरी राऊत, शिवानंद वैद्य, श्रीराम सुरोशे आदींनी आर्थिक भार उचलत नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या सुचनेनुसार व्यवसायातील गरीब व्यवसायिक व कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्याचा निर्णय घेतला.

पंधरा सलून व्यवसायिकांना धान्य वाटप

त्यामधून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार (ता. २३) बंदमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरातील पंधरा सलून व्यवसायिक व कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो गोडतेल, एक किलो मूगदाळ, एक किलो तूरडाळ, मीठ पुडा या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कळमनुरी शहराप्रमाणेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आखाडा बाळापूर, वारंगा फाटा येथील व्यवसायातील कामगार व सलून व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याकरिता पुढाकार घेतला.

येथे क्लिक करा-  हिंगोली जिल्‍ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

आखाडा बाळापूर येथे धान्याचे वाटप

आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर येथील नाभिक संघटनेचे किशोर ढोले, गजानन शिंदे, बाळू ढोले, अतुल ढोले, उत्तम महाजन, राजू सोनटक्के, सतीश महाजन, बाळू महाजन यांनी गरजुंना उदरनिर्वाहासाठी पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो खाद्यतेल, एक किलो तूर डाळ, एक चटणी पाकीट, मीठ पाकीट, एक किलो साखर आदी जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यात आला आहे. तसेच त्‍यांना कोरोना आजाराबद्दल माहिती सांगितली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalamnuri, Balapur in Distribution of grain to needy by Nabhik mahamandal