तरुणीचे अपहरण करून पुण्यात डांबले

आर. के. भराड
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात चार जणांवर रविवारी  गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूज (जि. औरंगाबाद) - वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपनीत जात असलेल्या 21 वर्षीय तरुणीचे रांजणगाव (शेणपुंजी) येथून अपहरण करून तिला ऑटोरिक्षातून पुण्यात नेले. तेथे तिला एका रूममध्ये डांबून ठेवले. मात्र, तरुणीच्या सतर्कतेमुळे ती त्यांच्या तावडीतून सुटली व तिने सरळ पोलिस ठाणे गाठले. 20 हजार रुपये घेऊन केलेल्या या कटकारस्थानाप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात चार जणांवर रविवारी (ता. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला. 

20 हजार रुपये घेऊन सचिन जनार्दन ताडेवाड याच्या सांगण्यावरून चौघांनी कटकारस्थान रचून वाळूज येथील कंपनीत कामाला जात असलेल्या 21 वर्षीय तरुणीचे शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास रांजणगाव येथील रिक्षा स्टॅंडवरून अपहरण केले. तसेच, रिक्षातील एकाने तरुणीच्या तोंडावर हात मारताच ती बेशुद्ध झाली. दुपारी दीडच्या सुमारास तरुणीला जेव्हा जाग आली तेव्हा ती एका रूममध्ये होती. रिक्षातील तिच मुले समोर उभी होती. तरुणीने त्यांना विचारणा केली असता तुला पुण्याला आणले असून तुला येथे आणण्यासाठी सचिन ताडेवाड याने आम्हाला वीस हजार रुपये दिले आहेत, असे सांगितले. यावेळी तरुणीने मला जाऊ द्या, अशी विनवणी केली. मात्र, त्यांनी तिचे ऐकले नाही.

काही वेळानंतर ताडेवाड तेथे आला. त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले व तो निघून गेला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिघे जेवणाचा डबा आणण्यासाठी गेले. तर, एकजण तेथेच थांबला. थोड्या वेळाने त्याला फोन आल्याने तो फोनवर बोलण्यासाठी बाहेरून कडी लावत बाजूला गेला असता तरुणीने सतर्कता बाळगत तिच्या मोबाईलवरून एका नातेवाइकास संपर्क केला. प्रकार लक्षात येताच त्यांनी तिला आजूबाजूला कोणी असेल तर मदतीसाठी बोलव, असे सांगितल्याने तरुणीने खिडकीतून आवाज देऊन एका मुलीस वर बोलावले. तिने दरवाजाची बाहेरून लावलेली कडी उघडताच तरुणीने तिचे आभार मानत तेथून थेट हडपसर पोलिस ठाणे गाठले व घडलेली आपबिती पोलिसांना सांगितली. दरम्यान, हडपसर पोलिसांनी तिला वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. सचिन ताडेवाड हा नेहमी तरुणीच्या वडिलांना, तसेच बहिणीच्या मोबाईलवर तिला पळवून नेईल, तिचे लग्न होऊ देणार नाही, असे मेसेज करत असे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping of woman at waluj