‘चल आपल्या गावाला...’

औरंगाबाद - हस्ता येथे लहान मुलांसाठी बांधण्यात आलेले सार्वजनिक किलबील स्वच्छतागृह.
औरंगाबाद - हस्ता येथे लहान मुलांसाठी बांधण्यात आलेले सार्वजनिक किलबील स्वच्छतागृह.

औरंगाबाद - कन्नडपासून सुमारे १८ किलोमीटर हस्ता हे ४०० ते ४५० उंबऱ्यांचे गाव. शेती, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय सर्वांचेच उपजीविकेचे साधन. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गावात पूर्वी पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असायचा; मात्र स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियान सुरू झाले आणि गाव शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त झाले. हस्ता पाहिल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘चल चल आपल्या गावाला, राहू नको रे शहराला...’ या भजनाच्या ओळींचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही इतका कायापालट व समृद्धी गावात आली आहे. 

ग्रामपंचायतीच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनोहर नीळ यांच्या रूपाने युवा नेतृत्व लाभले. सध्या महिलांसाठी सरपंचपद राखीव झाल्याने त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनाच गावकऱ्यांनी सरपंच म्हणून निवडले आहे.

मनोहर नीळ यांनी सुरू केलेल्या प्रयत्नात ग्रामस्थांनी सर्व हेवेदावे बाजूला सारून सहकार्य केले आणि गाव शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त झाले.

स्वच्छतागृहांची शंभर टक्‍के कामे झाली आहेत आणि त्यांचा वापरही केला जात आहे. ग्रामपंचायतीची देखणी वास्तू उभी आहे. कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकसहभागातून गावाशेजारच्या तीन नाल्यांची रुंदी आणि खोलीकरण करण्यात आले आहे. 

नियोजन महत्त्वाचे
पहिल्या टप्प्यात घरोघरी स्वच्छतागृह बनविणे, शोषखड्डे, तलावातील गाळ काढणे त्यानंतर गावशिवारातील पाणी शिवारातच जिरविणे, गावातील अंतर्गत रस्ते करून त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे असे आधी विकासाचे नियोजन करण्यात आले. घरोघरी वॉटर सोलर बसविले. जिल्हा परिषदेची शाळा आयएसओ बनविली. महिलांना कपडे धुण्यासाठी धोबीघाट तयार केला. प्रत्येक व्यक्‍तीने एक झाड लावून ते जगविणे, महिला बचत गटांची स्थापना, गावात पिठाची गिरणी सुरू करून ते टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेले आहे.

वंदना मनोहर नीळ (सरपंच, हस्ता) - गावात ९ सार्वजनिकसह ४१३ आणि शेतवस्त्यांवरील वैयक्‍तिक स्वच्छतागृहे मिळून ४८३ कुटंबांनी वैयक्‍तिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. गाव शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त आहे. ग्रामपंचायतीजवळच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही दुरुस्ती करून त्याचा नियमित वापर सुरू आहे. लहान मुलांनीदेखील उघड्यावर बसू नये यासाठी किलबिल स्वच्छतागृह बांधून त्यावर रंगरंगोटी केली आहे. आता वाढीव कुटुंबांपैकी २० ते २५ स्वच्छतागृहे नव्याने तयार झाली आहेत.  

सर्जेराव आव्हाळे (उपसरपंच, हस्ता) - घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत घरातून निघणारे सांडपाणी ड्रेनेजमध्ये गाळूनच जाते. ड्रेनेजमधून जाणारे पाणी एका ठिकाणी साठवून त्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा शेतीसाठी फेरवापर करण्याचे नियोजन आहे. ज्या घरांना ड्रेनेजची सोय नाही अशा ४५ घरांसाठी शोषखड्डे तयार करून सांडपाणी तिथेच जमिनीत जिरविले जाते. यामुळे गावात अस्वच्छता नावालाही दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com