माहूर - किनवट - नांदेड रस्त्याची दुर्दशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

किनवट - माहूर - किनवट - नांदेड या राज्य रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी दिला असून, या रस्त्याच्या कामाच्या निविदा निघून कामे सुद्धा कंत्राटदारांना मिळाले आहे. तरीही किनवट येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाने याच रस्त्यावर थातूरमातूर व निकृष्ट पद्धतीने कामे करून कंत्राटदाराला बिले उचलून दिले आहेत.

किनवट - माहूर - किनवट - नांदेड या राज्य रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी दिला असून, या रस्त्याच्या कामाच्या निविदा निघून कामे सुद्धा कंत्राटदारांना मिळाले आहे. तरीही किनवट येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाने याच रस्त्यावर थातूरमातूर व निकृष्ट पद्धतीने कामे करून कंत्राटदाराला बिले उचलून दिले आहेत.

मार्चमध्ये झालेला हाच रस्ता तीन महिन्यातच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी काेठारी ते सरसम व पुढे भाेकरपर्यंत उखडून केंद्र शासनाच्या सुधारित राष्ट्रीय महामार्ग निधी अंतर्गत सी. सी. रस्ता करण्यात येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या रस्त्यावरील कामाचा खर्च वाया गेला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

किनवट तालुक्यातील रस्त्याची अवस्था शासनाने काेट्यवधी रुपयांचा निधी देवूनही जैस थे असून, खड्ड्यात रस्ता, की रस्त्यावर खड्डे हे कळतच नाही. यास जबाबदार येथील नियाेजनशून्य कामासाठी प्रसिद्ध असणारे सार्वजनिक बांधकाम कार्यालय प्रशासन असल्याचा आराेप जनतेतून नेहमीच करण्यात येताे. आपल्या अखत्यारीतील कामे दर्जेदार व्हावीत, निविदेप्रमाणे करण्यात यावे, याकडे लक्ष न देता टक्केवारीसाठी गुत्तेदारीला लुट की खुली छूट याप्रमाणे कामे चालतात, असा आराेप जनतेतून केला जात आहे. याचा अनुभव पुन्हा येत असून, वर्ग झालेल्या, निविदा निघालेल्या राष्ट्रीय महामार्गावर जुने निधी शासनाकडे गेल्यास त्यातून मिळणारी टक्केवारी आपल्याला मिळणार नाही, या एकमेव भीतीपाेटी काेठारी (किनवट) ते इस्लापूरपर्यंत ठिकठिकाणी खड्डे बुजविणे व अंतराअंतरावर तुकडे पाडून डांबरीकरणाचा बारीक थर जे पावसाळानंतर टिकणार नव्हते, असे काम राज्य शासनाच्या तीन बजेटमधून सुमारे एक काेटीपेक्षा अधिक रक्कम गेल्या ता. ३१ मार्च २०१७ राेजी कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने बिलसुद्धा देवून टाकले.

येत्या जूनमध्ये, मार्चमध्ये केलेल्या या रस्त्यावरील सर्व डांबरीकरणाचा थर राष्ट्रीय महामार्गवाले उखडून हा रस्ता सिमेंट काँक्रेट पद्धतीने नव्याने बांधणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दाेन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाची सर्व माहिती असूनही राज्य शासनाचे काेट्यवधी रुपये काही लाेकप्रतिनिधी, अधिकारी, कंत्राटदार यांच्या कमिशनसाठी तर हे काम केले नसेल ना, असा प्रश्‍न जनतेतून चर्चिला जात आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाराजी व्यक्त केल्याचे कळते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे किनवट येथील शाखा अभियंता बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या रस्त्याची दुरुस्ती अत्यावश्‍यक असल्याने आम्ही दुरुस्तीची कामे केली असल्याचे सांगितले. माहूर - किनवट - नांदेड हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घाेषित झाल्यानंतर या मार्गाची दुरुस्ती व बांधकाम राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीचा हाेणार आहे.
या रस्त्याची सर्व जबाबदारी महामार्गाकडे राहणार असल्याने सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून या रस्त्याची मालकी संपल्यात जमा आहे. त्यानंतरही या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली राज्य शासनाला लाखाे रुपयांचा भूर्दंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियाेजनशून्य असणाऱ्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदेड येथील अधीक्षक अभियंत्यांनी चाैकशी करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

Web Title: Kinwat Nanded Road neglected