परभणीच्या ‘किरण’ला शालेय राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

-१७ मिनीट ०६.५० सेकंद वेळेची विक्रमी नोंद
-परभणीचा छगन बोंबले नवव्यास्थानी
-संगरुर (पंजाब) येथे  पार पडली स्पर्धा

परभणी : परभणीच्या किरण पांडूरंग मात्रे याने संगरुर (पंजाब) येथे  शनिवारी (ता.१४)  झालेल्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेच्या क्रॉसकंट्री स्पर्धेत स्वतःच्याच विक्रमात सुधारणा करीत सुवर्णपद पटकावले तर परभणीच्याच छगन मारोती बोंबले या स्पर्धेत बाराव्या स्थानी राहिला.

 संगरुर (पंजाब) येथे शनिवारी (ता.१४) शालेय राष्ट्रीय अॅथलेटीक्स स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरण मात्रे याने १९ वर्षाआतील मुलांच्या गटात सहा किलोमिटर अंतराच्या क्रॉसकंट्री स्पर्धा १७ मिनीट ०६. ५० सेकंदात जिंकून गतवर्षीचा आपलाच १७.२७ सेकंदाचा विक्रम तर मोडलाच त्याच बरोबर सुवर्णपदकाला गवसणी घातली. किरण याने सलग दुसऱ्या वर्षी ही विक्रमी कामगिरी केली.

हेही वाचा...  शासकीय यंत्रणेत शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास घट्टच

यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड स्कुल चॅम्पियनशीप स्पर्धेत देशाकडून खेळण्याची त्यास संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर किरण मात्रेचा सहकारी छगन बोंबले याने या स्पर्धेत १२ वे स्थान प्राप्त केले. हे दोनही खेळाडू मागील तीन वर्षापासून राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. 

साई इंटरनॅशनल स्पोर्ट्स अकॅडमीचे मोठे यश
परभणी येथील प्रशिक्षक रवि रासकटला यांच्या साई इंटरनॅशनल स्पोर्ट्स अकॅडमीने या वर्षात मोठे यश प्राप्त केले आहे. मराठवाडा एक्सप्रेस ज्योती गवते हिने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला नुकतेच कास्यपदक मिळवून दिले. पिंगळी येथील गोकुळनाथ विद्यालयात शिक्षण घेणारे किरण व छगन देखील याच अकॅडमीत श्री. रासकटला यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत.

किरण हा २०१६ पासून शालेय राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आहे. पहिल्या वेळेस तो दहावीला असतांना या स्पर्धेत सहभागी झाला होता. सन २०१७ मध्ये नागपुर येथील स्पर्धेत क्रॉसकंट्री स्पर्धेत सातवा प्राप्त केला. 

हेही वाचा...  रब्बी हंगाम बहरणार !

 

राज्य स्पर्धेत तीन हजार मिटरचे रौप्य पदक 
 

सन २०१८ मध्ये कऱ्हाड (जि.सातारा) येथील स्पर्धेत त्याने तीन हजार मिटरमध्ये रौप्य तर क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तर दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत क्रॉसकंट्रीत १७ मिनीट २७ सेकंदाची विक्रमी वेळ नोंदवून प्रथमच सुवर्णपदक पटकावले. या वर्षीच्या २०१९ च्या सातारा येथील राज्य स्पर्धेत त्याने पुन्हा क्रॉसकंट्रीचे सुवर्ण व तीन हजार मिटरचे रौप्य पदक पटकावले होते. तर छगन बोंबले याने क्रॉसकंट्रीत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे त्यांची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या यशाबद्दल त्याचे व प्रशिक्षक रवि रासकटला यांचे परभणी जिल्हा शारीरिक संघटना महासंघ व जिल्हा एकविध खेळ संघटनांनी अभिनंदन केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiran gets gold in school national crosscountry competition!