esakal | पोलिस ठाण्याजवळ ज्येष्ठ नागरिकावर चाकू हल्ला, चाकूरमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Crime News

चाकूच्या हल्ल्यामुळे रक्तबंबाळ झालेले श्री. शेटे यांना पाहून त्या चोरट्याने कुलूप काढून पोबारा केला.

पोलिस ठाण्याजवळ ज्येष्ठ नागरिकावर चाकू हल्ला, चाकूरमधील घटना

sakal_logo
By
प्रशांत शेटे

चाकुर (जि.लातूर) : शहरात पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील घरात घुसून चोरट्यांनी एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर चाकूने हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाली असून ही घटना रविवारी (ता.दहा) रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एका चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस स्टेशनच्या जवळ मन्मथ काशीनाथआप्पा शेटे (वय ७८) यांचे घर असून रविवारी रात्री अकराच्या सुमारास ते लघूशंकेसाठी घराबाहेर आले होते.

त्यावेळी लाईट गेलेली होती. अंधाराचा फायदा घेत एक चोरटा त्यांच्या घरात शिरला होता. लघूशंका करून ते घरात आले व दरवाजाला आतून कुलूप लावून घेतले. १० ते १५ मिनिटाने लपून बसलेल्या चोरट्याने श्री. शेटे यांच्या अंगावर बसून मला अकरा हजार रूपये द्या म्हणून पैशाची मागणी केली व कपाटाची चावी मागितली. चोरट्याने त्यांच्यावर चाकूने वार केला. भीतीपोटी श्री. शेटे यांनी मारू नकोस तुला काय पाहिजे ते घे असे म्हणत चाव्या चोरट्याच्या हाती दिल्या.

चाकूच्या हल्ल्यामुळे रक्तबंबाळ झालेले श्री. शेटे यांना पाहून त्या चोरट्याने कुलूप काढून पोबारा केला. आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदरील चोरट्याला ताब्यात घेतले आहे. श्री.शेटे हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून लातूर येथे पाठविण्यात आले.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

सोमवारी (ता.११) सकाळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, सिनेट सदस्य अॅड.युवराज पाटील, संदीप शेटे, अरविंद शेटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलिस निरीक्षक सोपान सिरसाठ यांची भेट घेऊन संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. चोरट्याने हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला असून श्री. शेटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोपान सिरसाट दिली.

संपादन - गणेश पिटेकर