राष्ट्रवादीकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी रंगीत तालीम सुरु, राजेश टोपेंनी घेतली आढावा बैठक

मनोज साखरे
Monday, 11 January 2021

शहरात पक्षाची स्थिती पाहता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत अंत्यत कमी आहे. यामुळे पक्षाचे संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले.

औरंगाबाद : पक्षाअंतर्गत असेलेला वाद मिटवा. गटबाजी बाजूला सारा, एकामेकांबद्दलचे मतभेद, तक्रारी समितीसमोर मांडा, त्या सोडविण्यात येईल. पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रतिमा जपावी, चुकीच्या गोष्टी करण्यापासून दोन हात लांब राहावे, असा कानमंत्र आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी दिला. संपर्कमंत्री झाल्यानंतर रविवारी (ता. १०) राष्ट्रवादी भवन येथे पहिल्या वहिल्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.

शहरात पक्षाची स्थिती पाहता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत अंत्यत कमी आहे. यामुळे पक्षाचे संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष कदीर मोलाना, शहराध्यक्ष विजय साळवे, अभिषेक देशमुख, व्दारकादास पार्थीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, छाया जंगले, भाऊसाहेब तरमाळे, जलीलभाई, दत्ता भांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यांना आधी शिस्त लावा
बैठकीला आलेले कार्यकर्ते फोटो काढण्यासाठी राजेश टोपे बसलेल्या मंचावर गर्दी करीत होते. पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू असताना कार्यकर्ते आपसांत बोलत होते. यावर टोपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत खडसावले. टोपे यांनी भाषणात कानमंत्रासोबतच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षाची शिस्त लावा अशा शब्दात त्यांनी कानही टोचले.

त्यांना न मागता तिकीट
‘राष्ट्रवादी’ फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्यांनी गरीब, तळागळातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे कामे केली पाहिजे. तसेच पक्ष व संघटन वाढवावे लागणार आहे. बुथ कमीटी, संघटन बांधणी व पक्षाची नोंदणी, सामान्यांचे प्रश्‍न उत्तमरित्या सोडवतील त्यांना न मागता तिकीट मिळेल. पक्ष स्व:हून त्याच्या घरी जावुन त्याला तिकीट देईल असे टोपे म्हणाले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

औरंगाबादच्या नामांतरावर सावध भूमिका
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन संभाजीनगर करावे अशी मागणी जोर धरत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरांचे नाव बदलण्यास तीव्र विरोध केला. ‘राष्ट्रवादी’कडुन नावाबद्दल कोणती स्पष्ट भुमिका समोर येत नाही. यावर औरंगाबादचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी विचारले असता. हा निर्णय महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते घेतील असे सांगून औरंगाबादच्य नाव बदलावर त्यांनी सावध भुमिका घेतली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Rajesh Tope Take Review Meeting Aurangabad Latest News