तीनशे रुपयांसाठी पानटपरीचालकावर चाकूहल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - तीनशे रुपयांच्या उधारीवरून पानटपरीचालकावर चाकूहल्ला केला. ही घटना शनिवारी (ता. १४) रात्री साडेनऊ नंतर पुंडलिकनगर भागात घडली. यात तीन संशयितांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त रामेश्‍वर थोरात यांनी दिली. संशयितांकडून चाकू जप्त करण्यात आला.

औरंगाबाद - तीनशे रुपयांच्या उधारीवरून पानटपरीचालकावर चाकूहल्ला केला. ही घटना शनिवारी (ता. १४) रात्री साडेनऊ नंतर पुंडलिकनगर भागात घडली. यात तीन संशयितांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त रामेश्‍वर थोरात यांनी दिली. संशयितांकडून चाकू जप्त करण्यात आला.

मयूर सुरेश जावळे (वय १९, रा. गजानननगर), ऋषिकेश ऊर्फ जितू गोसावी (रा. पुंडलिकनगर), प्रवीण ऊर्फ गोलू अरुण चव्हाण (रा. गजानन कॉलनी) अशी अटकेतील संशयित तिघांची नावे आहेत. सुलेमान उस्मान शेख (वय २१, रा. हुसेन कॉलनी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो साई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याचे पुंडलिकनगर येथे तिरुमला मंगल कार्यालयासमोर सागर पान सेंटर आहे. मयूरकडे पानसेंटर चालक सुलेमान शेख याची उधारी होती. 

मयूर उधारी देत नसल्याने सुलेमानने त्याचा मोबाईल स्वत:कडे ठेवून घेतला होता. पैसे आल्यानंतर मयूरने १४ एप्रिलला रात्री साडेनऊनंतर सुलेमानला फोन केला. ‘पैसे देतो, मोबाईल परत कर’ असे त्याने सांगितले. यावर ‘मोबाईल मित्राकडे असून, तो उद्या मिळेल’ असे सुलेमानने मयूरला सांगितले. यामुळे मयूरने त्याला शिवीगाळ करून पोलिस ठाण्यात तक्रार करतो, असे धमकावले. त्यामुळे सुलेमानने लगेचच मोबाईल देण्यास सहमती दर्शविली. एका मोबाईल शॉपीवर जाऊन त्याने मोबाईल घेतला. या दरम्यान मयूर, त्याचा मित्र ऋषिकेश ऊर्फ जितू गोसावी याच्या घरासमोर थांबला. दोघांनी सुलेमानला बोलावून घेतले. पाठोपाठ प्रवीण ऊर्फ गोलू तेथे पोचला. मयूरने सुलेमानला मोबाईलची मागणी केली. त्यानंतर प्रवीणजवळील चाकू घेत सुलेमानच्या पोटावर मयूरने वार केले. 

यात सुलेमान रक्तबंबाळ झाला. या प्रकरणात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, गुन्हेशाखा पोलिसांनी संशयितांना अटक केली.

Web Title: knife attack for three hundred rupees