बीडच्या वृक्षसंमेलनात क्रांती बांगर ठरली वृक्षसुंदरी 

Beed News
Beed News

बीड - सह्याद्री-देवराई वनप्रकल्प येथे आयोजित पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप शुक्रवारी (ता. 14) अभिनेते सयाजी शिंदे व पटकथा लेखक अरविंद जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. संमेलनात 11 ठराव संमत करण्यात आले. क्रांती बांगर हिने वृक्षसुंदरीचा किताब पटकाविला. 

शैलेंद्र निसर्गंध यांच्या ओसाड माळरानी फुलली ही देवराई या गीताने सुरवात झाली. श्रीकांत इंगळहडीकर यांचे दुर्मिळ वनस्पती, पोपट रसाळ यांचे वृक्ष बॅंक, सुनंदा पवार यांचे वृक्षसंवर्धनात महिलांचा सहभाग या विषयावर व्याख्यान झाले. दरम्यान, वृक्षसुंदरीच्या किताबाने क्रांती बांगरचा सन्मान करण्यात आला. 

स्पर्धेत 25 महाविद्यालयांतील 105 युवतींनी सहभाग नोंदवला. यातून विविध स्पर्धात्मक चाचण्यांतून 11 वृक्ष सुंदरींची निवड झाली. यातून क्रांती रामहारी बांगर (आयटीआय, बीड), ज्ञानेश्‍वरी इनामदार (केएसके), रविना सवई (बीड) या तिघींची निवड करण्यात आली. सयाजी शिंदे यांच्या हस्ते चांदीचा मुकुट परिधान करून तिचा गौरव करण्यात आला. दरम्यान, व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी आणि अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त श्रीकृष्ण दाभाडे या दोघांनी येथील झाडांसाठी पाण्याचे प्रत्येकी 50 टॅंकर देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. 

संमेलनात 11 ठराव संमत 

महाराष्ट्रातील परंपरागत जपलेल्या देवरायाला संरक्षित म्हणून जाहीर करून संवर्धन करावे, वड हा राष्ट्रीय वृक्ष असून त्याची महानता अबाधित ठेवावी, वडाच्या तोडीस बंदी घालावी, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल का करू नये? असा प्रश्न विचारावा, वृक्षारोप करताना स्थानिक वृक्ष, वनस्पती यांचाच वृक्षारोपणात समावेश असावा, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष अंबा असून धामन राज्यफुल आहे, प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ही झाडे लावावीत. राज्यातील गवताळ कुरणे, पानथळ जागा आणि तळी यांचे संरक्षण आणि संवर्धन करावे, विकासकामांसाठी वन्यजीव प्राण्यांची परंपरागत निवासस्थाने धोक्‍यात आली आहेत. यामुळे प्राण्यांच्या हक्काचे रस्ते करावेत, शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांना देशी रोप देऊन ते लावण्यास आणि वाढवण्यास प्रोत्साहन द्यावे, दरवर्षी आढावा घ्यावा, शाळांत यापुढे फक्त बहावा, बकुळ, ताम्हन, पारिजातक ही देशी झाडेच लावावीत आदी 11 ठराव संमेलनात संमत करण्यात आले. 

उपचार केलेल्या गरुडाला केले मुक्त 

उपचार घेऊन बरा झालेल्या गरुडाला संयोजक आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मुक्त करून परिसरातील पालवण येथील सह्याद्री - देवराई येथील दोनदिवसीय पहिल्या वृक्षसंमेलनाचे सूप शुक्रवारी (ता.14) वाजले. दरम्यान, संमेलनात 11 ठराव संमत करण्यात आले. 

गुरुवार (ता.13) व शुक्रवार (ता.14) या दोनदिवसीय वृक्षसंमेलनात वृक्षलागवड, संवर्धन, पर्यावरण, शेती आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली. या ठिकाणी वृक्षलावड व संवर्धनाची आणि विविध वृक्षांची शास्त्रीय माहिती देणाऱ्या स्टॉललाही मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शुक्रवारी संमेलनाच्या समारोपप्रसंगी सह्याद्री देवराईसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सायंकाळी सयाजी शिंदे यांनी उपचार केल्यानंतर बरा झालेल्या गरुडाला मुक्त करून वृक्षसंमेलनाचा अनोख्या पद्धतीने समारोप केला. सदरील गरुडावर सर्पराज्ञी प्रकल्प येथे मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते. यावेळी सिनेअभिनेते आणि पटकथा लेखक अरविंद जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी वृक्षसंमेलनानिमित्त आयोजित वृक्षसुंदरींचीही निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com