अमेरिकेतील क्रांती पाटील यांनाही वाटतेय मराठवाड्याची काळजी...

अभय कुळकजाईकर
Friday, 10 April 2020

अमेरिकेतील उत्तर पश्‍चिम भागात सिएटल या शहरामध्ये मराठवाड्यातील लातूरच्या क्रांती श्रीकांत जोशी पाटील या गेल्या १४ वर्षापासून राहत आहेत. त्यांचे पती श्रीकांत पाटील आयटी कंपनीत आहेत. त्यांनी अमेरिकेतील कोरोनाबाबतचे अनुभव आपल्याशी शेअर केले आहेत त्याचबरोबर आपल्या सर्वांना कळकळीची विनंतीही केली आहे की, तुम्ही देखील घरीच रहा तरच सुरक्षित रहाल. 

नांदेड - अमेरिकेतील उत्तर पश्‍चिम भागात सिएटल या शहरामध्ये मराठवाड्यातील लातूरच्या क्रांती श्रीकांत जोशी पाटील या गेल्या १४ वर्षापासून राहत आहेत. त्यांचे पती श्रीकांत पाटील आयटी कंपनीत आहेत. त्यांनी अमेरिकेतील कोरोनाबाबतचे अनुभव आपल्याशी शेअर केले आहेत त्याचबरोबर आपल्या सर्वांना कळकळीची विनंतीही केली आहे की, तुम्ही देखील घरीच रहा तरच सुरक्षित रहाल. 

अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण सिएटलमध्येच सापडला आणि मग सगळेच सावध झाले. सिएटलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या शाळा बंद झाल्या. या ठिकाणी सर्वात जास्त आयटी कंपनीचे कार्यालये आहेत. त्यांनी देखील काळजी घेत घरुनच काम करायला सांगितले. हॉटेल, लॉज सगळेच बंद करण्यात आले. त्याचबरोबर नागरिक देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच राहिले.

मास्क, ग्लोज, सॅनिटायझरचा वापर वाढला
अत्यावश्‍यक काम असेल तरच नागरिक बाहेर पडू लागले. घराबाहेर जाताना काळजी घेऊ लागले. त्याचबरोबर मास्क, ग्लोज, सॅनिटायझरचा वापर वाढला. किराणा माल, भाजीपाला, फळे आणली तर ती घरात आणण्यापूर्वी त्याची काळजी घेतली जाऊ लागली. गरम पाण्यात धुवुन घेण्यात येऊ लागली. गरजेपुरतेच बाहेर जाणे होऊ लागले. बाहेरुन आल्यानंतर स्नान करणे, कपडे लगेचच धुवुन टाकणे, ही काळजी आजही घेतली जात आहे. 

हेही वाचा - कोरोनाविरूद्धच्या लढाईत चिखलीकर सरसावले

परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली
आमच्या इथल्या राज्याचे गव्हर्नर व प्रशासनाने परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. नागरिकांनीही त्यांना प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम आता चांगला दिसत आहे. कोरोनाबद्दल आता मी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. कारण तुम्हाला देखील बरीच माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो कसा होता आणि काय आहे हे मी सांगत नाही. तुम्ही देखील बऱ्याच बातम्या वाचत आहात. अमेरिकतील काही भागात अजूनही कोरोना मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्या. 

देशाची, महाराष्ट्राची काळजी वाटते
आम्ही आपल्या भारतापासून, महाराष्ट्रापासून खूप लांब आहोत. आम्हाला देखील आपल्या सगळ्यांची काळजी वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने ज्या पद्धतीने भारतातील परिस्थिती हाताळत आहेत. त्याचे आम्हाला अमेरिकेत खूप कौतुक आहे. आम्ही सर्व भारतीय आणि महाराष्ट्रातील नागरिक अमेरिकत बसून माहिती घेत असतो. महाराष्ट्रातील सरकारसुद्धा लोकांची खूप काळजी घेताना दिसत आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस, महापालिका, स्वच्छताचे कर्मचारी, प्रसारमाध्यमे या सगळ्यांनी खूप मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या कार्याला माझा देखील सलाम...

हेही वाचलेच पाहिजे - कोरोना : काहीच धोका होणार नाही, फक्त स्वतःला जपा

युरोपात परिस्थिती हाताबाहेर
युरोपमध्ये, अमेरिकेत, इटली, स्पेन आदी देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेकजण कोरोनामुळे मरत आहेत. खूप लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे उपचार करताना देखील खूप त्रासदायक होत आहे. या ठिकाणीसुद्धा डॉक्टर, नर्स, मेडीकल फिल्ड, पोलिस, अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, मीडिया आदी देखील कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र झटत आहेत. कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी जगाच्या पाठीवर सगळेच धडपड करत आहेत. 

नवीन आशेचा किरण नक्कीच येईल
मी तसेच माझे पती आणि माझी मुलगी आम्ही तिघेही घरीच आहोत. मी गाण्याचा छंद जोपासत स्वयंपाकाची जबाबदारी घेतली आहे तर पती घरी बसून लॅपटॉपवर काम करत आहे. मुलगी देखील घरुनच आनलाईन शाळा आणि अभ्यास करत आहे. आम्हाला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटते. भारतापासून आम्ही खूप दूर आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना कळकळीची विनंती की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर त्यासाठी घरातच राहणे महत्वाचे आहे. गर्दी टाळणे महत्वाचे आहे. अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. स्वच्छतेचे नियम पाळा. चांगले परिणाम आपल्याला लवकरच दिसतील. हे ही दिवस जातील आणि नवीन आशेचा किरण आपल्यासाठी वाट पहात असेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kranti Patil in the US is also worried about Marathwada ..., Nanded news