औंदा सालगडी ठरला; मात्र कामावरच आला नाय... 

कमलेश जाब्रस
Saturday, 28 March 2020

ग्रामीण भागामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला सालगडी बदलतात. मोठ्या प्रमाणावर झालेली उसाची लागवड तसेच होत असलेल्या फळबाग लागवडीमुळे पाडवा सणाच्या आधी सालगडी ठरविला; मात्र कोरोना विषाणूमुळे एकवीस दिवसांचा लॉकडाऊन झाला. यामुळे परगावाहून येणारे सालगडी आलेच नाहीत.

माजलगाव (जि. बीड) -  ग्रामीण भागामध्ये नवीन वर्षाची सुरवात ही पाडव्याला होते. यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढलेली असल्याने बहुभूधारक असलेल्या शेतकऱ्यांनी सालगडी ठरवला; मात्र ऐन पाडव्याच्या सणापूर्वीच कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाले. पहिला सालगडी काम सोडून गेला, नवीन सालगडी कामावरच आला नाय. यामुळे शेतीतील कामे खोळंबली, तर छोट्या-मोठ्या कामांना मजूरही मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

तीन ते चार वर्षांपासून माजलगाव तालुक्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत होती; परंतु यावर्षी परतीचा चांगला पाऊस झाला. माजलगाव धरण शंभर टक्के भरले. भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याने विहीर, विंधनविहिरींना मुबलक पाणी आले. ग्रामीण भागामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला सालगडी बदलतात.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

मोठ्या प्रमाणावर झालेली उसाची लागवड तसेच होत असलेल्या फळबाग लागवडीमुळे पाडवा सणाच्या आधी सालगडी ठरविला; मात्र कोरोना विषाणूमुळे एकवीस दिवसांचा लॉकडाऊन झाला. यामुळे परगावाहून येणारे सालगडी आलेच नाहीत. जुन्या सालगड्याने मात्र साल संपल्यामुळे काम सोडले आहे. शेतामध्ये कामे खोळंबली असल्याने शेतकरी मात्र हैराण झाला आहे. 
 

परजिल्ह्यातील सालगडी ठरविला होता. पैसेही उचल दिले आहेत; परंतु लॉकडाऊनमुळे सालगडी येण्यास तयार नाही. ना वाहतुकीची सोय ना पेट्रोल-डिझेल. ठिकठिकाणी असलेल्या चेकपोस्टमुळे सालगडी गावाकडेच अडकला आहे. असे असले तरी खोळंबलेली कामे पुन्हा होतील; परंतु सध्या कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग रोखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. 
- दत्ता कुरे, शेतकरी, मनूर (ता. माजलगाव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The laborer agreed; But the work itself did not