मजुरांचे जत्थे पायीच निघाले गावाच्या प्रवासाला 

रामदास साबळे
रविवार, 29 मार्च 2020

महामार्गाच्या कामावर परराज्यातून आलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पोटाला अन्न मिळत नसल्याने हे मजूर आपल्या राज्यात पायी परतत असल्याचे दिसून येत आहे. 

केज (जि. बीड) - सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने अशा परिस्थितीत कोणाच्याही हाताला काम नाही. तालुक्यात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामावर परराज्यातून आलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पोटाला अन्न मिळत नसल्याने हे मजूर आपल्या राज्यात पायी परतत असल्याचे दिसून येत आहे. 

तालुक्यात कोरोना व्हायरसचा होणारा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या संचारबंदीबरोबरच जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अशा गंभीर परिस्थितीत बिहार व उत्तर प्रदेशातून तालुक्यात सुरू असलेल्या जामगाव-सांगोला व अहमदपूर-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर मजूर आलेले आहेत. सध्या महामार्गाचे काम बंद असल्याने हाताला काम नाही.

हेही वाचा - परळीतील लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

मग पोटा-पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण झाले आहे. परराज्यातून कामासाठी मजुरांना घेऊन आलेले कंत्राटदार तिकडेच अडकल्याने किराणा साहित्य संपल्याने त्यांच्या उभ्या केलेल्या तात्पुरत्या प्लँटवरील खानावळी बंद झालेल्या आहेत. मग खाण्यासाठी अन्न ना पिण्यासाठी पाणी अशी भयानक परिस्थिती ओढावल्याने हे मजूर उपासी मरण्यापेक्षा आपले गाव जवळ केलेले बरे म्हणत मजुरांचे जथेच्या-जथे पायीच प्रवासाला निघाल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - ग्रामीण भागातील रस्त्यावर जागोजागी कुपाट्या

पायी प्रवासात कोणते संकट ओढावेल, आपण गावी जाऊ की नाही, याचा यत्किंचितही विचार न करता देवावर विश्वास ठेवून रखरखत्या उन्हात मार्गक्रमण करीत आहेत. अशा परिस्थितीत जात असलेल्या मजुरांबाबत केज येथील तहसीलदार व‌ पोलिस निरीक्षकांना विचारले असता दळणवळण पूर्णतः बंद असून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असल्याचे सांगितले. त्यांनी विनाकारण जोखीम घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. 

पोलिस मदतीला धावले 
रविवारी सकाळी पायी निघालेल्या या परप्रांतीय मजुरांना केज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहायक पोलिस उपनिरीक्षक इनामदार, पत्रकार गौतम बचुटे यांनी शिवाजी महाराज चौकात बिस्किट व पाण्याची व्यवस्था केली होती. तर दुपारी येणाऱ्या तहसीलदार दुलाजी मेंडके व ग्रामसेवक धनराज सोनवणे यांनी फराळाची व्यवस्था केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The laborers started returning to the village