कमाई सोडाच, जेवणाचीही भ्रांत

Jyoti-Shinde
Jyoti-Shinde

औरंगाबाद - ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख. हंगाम संपल्यानंतर या मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ती कामे करण्यासाठी मागे पुढे न पाहणारी गेवराई तालुक्‍यातील (जि. बीड) अंतरवली आणि तलवाडा आदी गावांतील मजुरांच्या कुटुंबांनी सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात स्थलांतर केले. यातील महिला विहिरीवर क्रेन चालविण्याचे काम करीत आहेत. दोन पैसे कमवणे दूरच; मात्र किमान दोन वेळेचे जेवण मिळावे यासाठी ही कुटुंबे संघर्ष करीत आहेत.

विहीर खोदणे, ब्लास्टिंगनंतरची दगडगोटे (खरपण, गाळ) क्रेनद्वारे काढण्यासारखी जिवावर उदार होऊन करावयाची कष्टाची कामे आजवर पुरुषच करीत आलेला आहे; मात्र मला ‘त्या’ विहिरीवर वेगळचं चित्र पाहायला मिळाले. घारगाव, कांदलगाव (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) या भागांत साधारण १५ ते २० ठिकाणी महिला विहिरीवर कामे करताना दिसल्या. ‘‘दुष्काळानं आमच्यावर ही वेळ आणलीय, यातनं गाठीला दोन पैसे म्हागं ऱ्हात न्हाईतं; पण दोन येळचं खाता येतंय. तेही या दिसात पुरेसं हाय, म्हणून हे असलं काम करतोत,’’ असे शिंदे कुटुंबातील महिला सांगत होत्या. 

परंडा तालुक्‍यातील घारगाव फाट्यावरून आत जाणाऱ्या रस्त्याने निघालो. घारगाव ओलांडल्यावर कांदलगाव शिवारात रस्त्याच्या अगदी बाजूलाच शरद सरवदे यांच्या विहिरीचे काम सुरू होते. महिला क्रेन चालविताना बघून क्षणभर स्तब्धच झालो. या विहिरीवर कुटुंबातील एक, दोन नव्हे तर संपूर्ण कुटुंबच काम करीत होतं. अंतरवली (जि. बीड) येथील पूजा व अंकुश शिंदे, ज्योती व राहुल शिंदे, राधा-नितीन शिंदे या दांपत्यांसह पार्वती शिंदे या साधारण ७० वर्षांची आजी दिवसभर उन्हात काम करतात. विहिरीवर पोचलो तेव्हा काम संपविण्याच्या घाईत हे कुटुंब होते. 

दुष्काळ हाय; पण मजुरांना मिळतेय काम 
‘‘मुळात आमचा भाग दुष्काळी; पण तालुक्‍यातल्या काही गावांत शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, एमआरईजीएसमधून काही हिरी (विहिरी) मंजूर झाल्यात. त्यामुळे सरकारनी दिल्यालं पैसं हिरी खंदायला गुंतीवल्यात,’’ असे विहीरमालक श्री. सरवदे म्हणाले. 

विहीरमालकासाठी मजुरांच्या डोळ्यांत पाणी 
दुष्काळामुळे घर सोडावं लागलं. कामासाठी ज्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यात कामासाठी आलो आहोत, तिथेही दुष्काळच आहे; मात्र थोड-थोडके सधन शेतकऱ्यांनी हाताला काम दिले आहे. तसेच शासनाचे विहिरींना अनुदान मिळाल्याने विहीरमालकांकडून कामाच्या मजुरीपोटी वेळेवर पैसा मिळतो. त्यामुळे किमान जगता तरी येतं; पण विहिरींना पाणी लागले नाही तर विहीरमालकांची अवस्था बघून डोळ्यांत पाणी येतं, असं म्हणत मजूर पार्वती शिंदे यांचे डोळे पाणवले. 

असा मिळतो मोबदला 
या मजुरांना विहीर खोदण्यासाठी फूट पद्धतीने काम दिले जाते. विहीरमालकाने साधारण पंचवीस ते तीन फूट विहीर जेसीबी, पोकलेनने खोदल्यानंतर या मजुरांना विहीर खोदण्यासाठी गुत्ते (उक्त) पद्धतीने दिली जाते. यासाठी मजुरांना साधारण खोदकाम पाच हजार रुपये प्रति फूट; तसेच पाषाण खोदकाम हे आठ हजार रुपये प्रति फूट या दराने दिले जाते. यातून प्रति मजूर साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति दिवस मजुरी मिळते, असे विहीरमालक शरद सदावर्ते यांनी सांगितले.

लहान-लहान लेकरांना घेऊन विहिरीवर कामं करावी लागतात. क्रेन चालवणं तसं कष्टाचंच काम; पण जगण्यापुढं पर्याय शोधता येत नाही. मिळेल ते करावंच लागतं. याव्यतिरिक्त आमच्या भागात जर शासनानी कामं काढली असती, तर घर सोडायची वेळ आली नसती. कामाच्या ठिकाणी पाल ठोकून राहतो. 
- ज्योती शिंदे, क्रेनचालक मजूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com