गाढ झोपेतच डोक्यात दगड घालून मजुराने केला गवंड्याचा खून, बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना

अनिरूद्ध धर्माधिकारी
Thursday, 26 November 2020

पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना डोक्यात दगड घालून बांधकाम मजुराने गवंड्याचा खून केला. गुरुवारी (ता.२६) पहाटे तालुक्यातील देवीनिमगाव येथे ही खळबळजनक घटना घडली.

आष्टी (जि.बीड) : पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना डोक्यात दगड घालून बांधकाम मजुराने गवंड्याचा खून केला. गुरुवारी (ता.२६) पहाटे तालुक्यातील देवीनिमगाव येथे ही खळबळजनक घटना घडली. आरोपी कांतीलाल मारुती काकडे यास अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की तालुक्यातील देवीनिमगाव येथील वाळके-अनारसे वस्तीवरील रहिवासी गोरख नारायण पाचारणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी गवंडी म्हणून ईश्वर दत्तू नवसुपे (वय २७), तर मजूर म्हणून कांतीलाल मारुती काकडे (वय ४०) हे दोघे कामावर आहेत.

बुधवारी (ता.२५) सायंकाळी काम आटोपल्यानंतर जेवण करून हे दोघेही काम सुरू असलेल्या ठिकाणीच झोपले होते. गुरुवारी (ता.२६) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मजूर कांतीलाल काकडे याने गाढ झोपेत असलेल्या ईश्वर नवसुपे यांच्या डोक्यात अचानक शेजारीच असलेला मोठा दगड घातला. गंभीर जखमी झालेले नवसुपे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आरोपीने बांधकाम सुरू असलेल्या मालकाच्या चारचाकी वाहनावरही (एमएच-०२ डीजे-२५७४) दगडफेक करून गाडीचे नुकसान केले.

जखमीला तातडीने नगर येथील दवाखान्यात उपचारांसाठी हलविण्यात आले. मात्र, डॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती प्राप्त होताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, पोलिस हवालदार राजेंद्र काकडे, पोलिस कर्मचारी चंद्रकांत काळकुटे, गंगाधर आंग्रे, संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी घराचे बांधकाम सुरू मालक असलेले गोरख नारायण पाचारणे यांनी अंभोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ज्ञानेश्वर कुकलारे हे करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labourer Murdered Man With Help Of Stone Beed News