esakal | आस्थापनाच नसल्याने बीईओ कार्यालये हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र.

नवीन तालुकानिर्मिती झाल्यानंतर अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना आस्थापनाच मंजूर नसल्याने अधिकारीवर्ग हैराण झाला आहे. शाळा व विद्यार्थीसंख्येसह ऑनलाइन कामेच प्रभारींवर सुरू आहेत, हे विशेष. 

आस्थापनाच नसल्याने बीईओ कार्यालये हैराण

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना - नवीन तालुकानिर्मिती झाल्यानंतर अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना आस्थापनाच मंजूर नसल्याने अधिकारीवर्ग हैराण झाला आहे. शाळा व विद्यार्थीसंख्येसह ऑनलाइन कामेच प्रभारींवर सुरू आहेत, हे विशेष. 

राज्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना कर्मचारी आस्थापनाच नसल्याने अधिकारीवर्ग त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. शाळांची संख्या, पर्यवेक्षकीय यंत्रणा, शिक्षकसंख्येसह समस्यांच्या डोंगरावर शिक्षण विभाग आहे, जिल्ह्यातील बदनापूर, मंठा व घनसावंगी तालुकानिर्मिती झाली तेव्हा विविध विभागांची कार्यालये सुरू झाली होती. याचबरोबर गटशिक्षणाधिकारी कार्यालय सुरू झाले होते; परंतु तालुकानिर्मितीपासून सदर गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना कर्मचारी आस्थापनाच मंजूर करण्यात आलेली नाही. तरीही अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाचा कारभार सुरू आहे.

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

तालुक्यात जिल्हा परिषद, खासगी संस्थांची शाळा, महाविद्यालये आहेत. पहिली ते बारावी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. एकूण संख्या आणि विद्यार्थीसंख्या विचारात घेता कामाचा आवाका आणि विस्तार मोठा आहे. बदनापूर तालुक्यात विविध व्यवस्थापन व माध्यमाच्या २५० शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. विद्यार्थीसंख्या विचारात घेता ३५ हजारांपेक्षा अधिक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेसह शिक्षक संख्या ६५० इतकी आहे. गटशिक्षणाधिकारीपद असले, तरी कर्मचारी आस्थापनाच नसल्याने इतर शाळांतील शिक्षकांकडून कामे करून घ्यावी लागतात, असा गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा अनुभव अनेक वर्षांपासून आहे. खरेतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कक्ष अधीक्षक, मुख्य लिपिक, लिपिक, दोन शिपाई अशी किमान आठ पदे असायला पाहिजेत, असे अधिकारी यांचे म्हणणे आहे; परंतु एकही कर्मचारी कायम नसल्याने प्रभारींवर कार्यालयाचा कारभार सुरू असल्याचे शिक्षक संघटनेने सांगितले आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

पर्यवेक्षकीय यंत्रणा, शिक्षकसंख्येसह विविध अभिलेखे तयार करताना मात्र अधिकारीवर्ग त्रस्त असल्याचे विस्तार अधिकारी यांनी सांगितले. शालेय पोषण आहार, ऑनलाइन शिक्षण, निवडणूक कामे, सर्वेक्षण अशी कामे करण्यासाठी शिक्षकवर्गाचे नियोजन करणे विभागाला अवघड जात असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. शिक्षकांच्या सेवापुस्तिका नोंदी करणे, महिला शिक्षिका रजा नोंदीसह अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने शिक्षकवर्गही त्रस्त असल्याचे दिसून येते. युडायस माहिती, सरल प्रणाली, विविध प्रकारच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती कामे, परीक्षाविषयक कामे करण्यासाठी संबंधित शाळेतील शिक्षकांकडून करून घ्यावी लागत असल्याचे गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी सांगितले आहे. शालेय पोषण आहार व अनेक कामे करण्यात अधिक वेळ जातो. शैक्षणिक कामापेक्षा अशैक्षणिक कामांचा ताण पडत असल्याचे मुख्याध्यापक संजय हेरकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात तीन तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास आस्थापनाच मंजूर नाही. पर्यायाने कामे करण्यासाठी शाळेतील शिक्षकांना बोलवावे लागते. ऑनलाइन कामे, शालेय पोषण आहार व सेवापुस्तिका कामाचे स्वरूप अधिक आहे. 
- कैलास दातखीळ, 
शिक्षणाधिकारी, जालना 

loading image
go to top