esakal | आहारात पोषक घटकांची कमतरता, नगदी पीक घेत असल्याचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

3Untitled_7_37

नगदी पिक घेण्याचे प्रमाण वाढल्याने आहारात पोषक घटकांची कमतरता असते.

आहारात पोषक घटकांची कमतरता, नगदी पीक घेत असल्याचा परिणाम

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : ‘‘शेतीमध्ये घेत असलेल्या नगदी पिकांमुळे आहारात पोषक घटकांची कमतरता जाणवत आहे. म्हणूनच दैनंदिन आहारात पोषक तत्त्वांची वाढ करण्यासाठी शेती पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे,’’ असे मत मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. डिग्रसे यांनी येथे व्यक्त केले.


मांजरा कृषी विज्ञान केंद्र व एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्रात पोषण माह २०२० अभियानाअंतर्गत आरोग्यदायी पोषणबाग, निरोगी स्वास्थ्यासाठी पोषक आहार, परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. बंडगर, तसेच विस्तार अधिकारी श्री. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

लातुरला रेल्वे तर सोडाच येत्या काळात टॅंकरनेही पाणी आणण्याची गरज भासणार नाही


जिल्ह्यातील ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीमध्ये घेत असलेल्या नगदी पिकांमुळे शेतकरी कुटुंबाच्या आहारात पोषक घटकांची कमतरता जाणवत आहे. म्हणूनच दैनंदिन आहारात पोषक तत्त्वांची वाढ करण्यासाठी शेती पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. यामध्ये सुधारित पीक उत्पादन पद्धती, जैवसमृद्ध पिकांच्या जाती, फळे व भाजीपाल्याची पोषणबाग निर्मिती, परसबागेतील कुक्कुटपालन अशी एकत्रित शेती पद्धती या क्रमाने शेती विकसित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी बंडगर यांनी गावातील अंगणवाडीमध्ये कार्यकर्तींमार्फत पोषणबागेची निर्मिती करण्यात येईल; तसेच गावातील महिलांना पोषणबाग निर्मिती व कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे सांगितले. यामुळे बालके, किशोरवयीन मुले/मुली, महिला यांच्यामधील कुपोषण, ॲनिमिया यांचे प्रमाण कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल, असेही ते म्हणाले. कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ अंजली गुंजाळ यांनी उत्तम स्वास्थ्यासाठी पोषण आहार आणि पोषणबाग निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये पोषणबागेचे फायदे, जागेची निवड आणि आखणी प्रकार, योग्य जातीची लागवड, फळे व भाज्यांचे प्रकार, भाज्यांचे वार्षिक वेळापत्रक व पोषणबागेचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली.

संपादन - गणेश पिटेकर