महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करा

सुषेन जाधव
Friday, 6 December 2019

  • जिल्हा महिला वकील संघाची मागणी
  • जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे घातले साकडे
  • ...महिला वकील मोफत लढणार

औरंगाबाद : महिलांवरील अन्याय-अत्याचार तसेच महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे, तसेच जलदगती न्यायालयाद्वारे महिलांचे प्रश्न सोडवले जाऊन त्यांना न्याय द्यावा आणि कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यांत निकाल लावण्याचा कायदा करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा महिला वकील संघातर्फे जिल्हाधिकारी यांना गुरुवारी (ता. पाच) देण्यात आले.

 

महिलांवर वर्षानुवर्षे अन्याय-अत्याचार होत आहेत. त्यामुळे देशात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हा महिला वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा- VIDEO : राजकारणी हे आमच्यापेक्षा मोठे अभिनेते : प्रशांत दामले

काय आहेत मागण्या?
महिलांवरील अन्याय-अत्याचार तसेच महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे, संसदेतील तसेच विधानसभेतील निवडून आलेल्या महिलांनी एकत्र येऊन महिलांचे दिवाणी व फौजदारी स्वरूपातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नवीन कठोर कायदा निर्माण करण्यासाठी सभागृहात ठराव पारित करून घ्यावा, जिल्हा-तालुकास्तरावर महिलांचे प्रश्न तसेच अन्याय-अत्याचारासंदर्भात कार्यालयांमध्ये विशेष कक्ष निर्माण करून तातडीने दिवाणी व फौजदारी स्वरूपातील प्रकरणे ही पोलिस ठाणे, न्यायालयांच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यांत निकाली लावावीत, बलात्कार करून खून करणाऱ्यांना फाशीच झाली पाहिजे आणि तसे बिल संसदेत लवकरात लवकर पारित करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा- जयदत्त क्षीरसागरांच्या पराभवाचे खापर भाजपवर?

...तर मोफत लढा देऊ
अत्याचारपीडित महिलेसह साक्षीदारांना संरक्षण मिळावे, पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, निकाल लागल्यानंतरही कुटुंबीयांना किमान सहा महिने संरक्षण मिळावे, त्याचवेळी जिल्हाधिकारी, तहसील व पंचायत समिती कार्यालयांमध्ये विशेष कक्ष उघडून महिलांना संरक्षण व मदत केंद्रे तातडीने सुरू करावीत. जिल्हा व तालुकास्तरावर पीडितांसाठी केंद्र उभारल्यास वकील संघाच्या महिला नि:शुल्क काम करतील, असेही संघाच्या वतीने कळवण्यात आले आहे. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष लता झोंबाडे, सुनीता करमनकर, अस्मा शफिक शेख, नंदा गायकवाड, ज्योती पत्की, मीनाक्षी सावंगीकर, पुष्पा घोडके, सविता इंगळे, संभाजी तोवर आदींची उपस्थिती होती.

हे वाचलंत का? अरेरे!!! मुलाचा जीव गेला; पण पित्याला मिळेना न्याय (वाचा घडले तरी काय)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ladies Advocates demanding to start Separate Court for Woman