उत्तराखंडमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 120 भाविक सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

या भाविकांबद्दल अधिक माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02456-222560, 09527044171 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण कक्षाने केले आहे.

हिंगोली - हिंगोली जिल्हयातून बद्रीनाथ येथे दर्शनासाठी गेलेले भाविक विष्णू प्रयाग जवळच अडकून पडले आहेत. तेथील जोशीमठातील कालीकमलीवाली धर्मशाळेचा या भाविकांनी आसरा घेतला आहे. सर्व भाविक सुखरूप असून जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांशी संपर्क साधून त्यांना आवश्‍यक ती मदत देण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.

हिंगोली तालुक्‍यातील सवड, केसापूर, वरुड, आडगाव यासह विविध वीस गावातील भाविक शुक्रवारी (ता.5) साईबाबा ट्रॅव्हल्सद्वारे बद्रीनाथ येथे दर्शनासाठी निघाले होते. हे सर्व भाविक दोन दिवसांपुर्वी विष्णूप्रयाग येथे पोहोचल्यानंतर तेथे भुस्खलन झाल्याने पुढील रस्ता बंद झाला. त्यामुळे हे भाविक जोशीमठात कालीकमलावाली धर्मशाळेत दोन दिवसांपासून मुक्कामी थांबले आहेत. या भाविकांनी स्वयंपाकाचे साहित्य सोबत घेतले असून पाण्याची अडचण नसल्याचे सांगितले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची या ठिकाणी नियुक्ती केली असून जिल्ह्यातील भाविक उत्तराखंड येथे गेले असल्यास त्याची तातडीने माहिती 02456-222560 या क्रमांकावर देण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, विष्णू प्रयाग येथे धर्मशाळेत असलेल्या भाविकांशी जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी संपर्क साधला असून त्यांच्याशी अडचणी बाबत चर्चा केली. याशिवाय तेथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधूनही भाविकांची माहिती दिली आहे. त्यामुळे या भाविकांना अडचण भासल्यास तातडीने मदत करण्याबाबत कळविण्यात आले आहे. हे सर्व भाविक सुखरुप असून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नसल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या शिवाय आणखी काही भाविक या भागात गेले आहेत काय याची माहिती घेण्याचे कामही जिल्हा प्रशासनाने सुरु केले आहे. संपूर्ण प्रवासामधे तातडीने मदत लागल्यास तेथील नियंत्रण कक्ष किंवा हिंगोलीच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी भाविकांना दिल्या आहेत.

या शिवाय शहरातील रमेश कावडे व शोभा कावडे हे उत्तराखंड येथे गेले असून ते सध्या चामोली जिल्ह्यातील पिंपळकोटी येथे सुखरूप आहेत. तर जवळाबाजार, लाख, पांगरा येथील पंधरा पर्यटक योगेश यात्रा कंपनीने गले असून ते जोशीमठ येथे सुखरुप असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. 

काळजी करू नका- भाविक व्यंकटेश जाधव यांची माहिती
उत्तराखंडमधील विष्णू प्रयाग जवळच भुस्खलन झाले आहे, तेथून जवळच आम्ही थांबलो असून, रस्ता मोकळा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, त्यामुळे काळजी करू नका, रविवारी (ता.20) बद्रीनाथकडे रवाना होणार असल्याचे भाविक व्यंकटेश जाधव यांनी "सकाळशी" बोलतांना सांगितले.

चार वर्षापुर्वीची जलप्रलयाची आठवण
चार वर्षापुर्वी उत्तराखंडमध्ये जलप्रलयाने सुमारे दहा पेक्षा अधिक भाविक गमावलेल्या हिंगोलीकरांच्या अंगावर विष्णूप्रयाग येथील भुस्खलनाच्या घटनेने शहरे आले आहे. चार वर्षापुर्वीच्या आठवणी या घटनेमुळे पुन्हा ताजा झाल्या आहेत. हिंगोली जिल्हयातून चार वर्षापुर्वी पंन्नास पेक्षा अधिक भाविक केदारनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. जूलै २०१३ मध्ये झालेल्या जलप्रलयामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुमारे दहापेक्षा अधिक भाविक बेपत्ता झाले होते. या भाविकांच्या शोधासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. तर उत्तराखंड सरकारने सुरु केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधूनही त्यांची माहिती मिळत नव्हती. त्यानंतर सर्व बचावकार्य पार पडल्यानंतरही त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याबाबत उत्तराखंड सरकारच्या पथकाने हिंगोलीकडे प्रमाणपत्रेही पाठवून दिली होती. या घटनेचा आता काहीसा विसर पडू लागला होता. मात्र, दोन दिवसांपुर्वी विष्णूप्रयाग येथे झालेल्या भुस्खलनाच्या घटनेने हिंगोलीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. मागील चार वर्षापुर्वीच्या आठवणी या घटनेमुळे ताजा झाल्या आहेत. हिंगोलीतून गेलेले सर्व भाविक सुखरूप असल्याचे निरोप दिले जात आहेत.

Web Title: Landslide in Uttarakhand; 120 pilgrims of Hingoli stuck